सायकलस्वारांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरीता महापालिकेचा पुढाकार

0
301

आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांची माहिती

पिंपरी दि. १७ (पीसीबी) – शहरात सायकलस्वारांसाठी सायकल चालविण्याच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरीता महापालिकेने पुढाकार घेतला आहे. शहरातील पादचारी आणि सायकलस्वारांना प्राधान्य देण्यासाठी पिंपरी- चिंचवड महापालिकेने नॉन-मोटराईज्ड ट्रान्सपोर्ट पॉलीसी आखली असून या पॉलीसीचा शुभारंभ आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याहस्ते करण्यात आला.

रामकृष्ण मोरे सभागृह येथे 15 सप्टेंबर रोजी अभियंता दिनानिमित्त अभियंते, अधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडकरांसाठी ‘नॉन-मोटराइज्ड ट्रान्सपोर्ट पॉलिसी’ सूरू करण्यात आली. यावेळी शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, सतिश इंगळे, संजय कुलकर्णी, प्रमोद ओंबासे, उपायुक्त मनोज लोणकर, स्वप्नील पाटील, डेप्युटी डायरेक्टर प्रसाद गायकवाड, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, माजी अतिरिक्त आयुक्त प्रवीण तुपे, माजी सह शहर अभियंता संदेश चव्हाण, उप अभियंता सुनिल पवार आदी मउपस्थित होते.    

प्रांजली देशपांडे (मोबिलिटी तज्ञ), आशिक जैन (सायकल महापौर) आणि प्रांजल कुलकर्णी यांच्या सहकार्याने बीआरटीएस विभागामार्फत धोरण तयार करण्यात आले आहे. महापालिकेने नागरिक सर्वेक्षण, अधिकारी आणि तज्ञांच्या अभिप्रायाद्वारे व्यापक धोरण तयार केले असून लवकरच स्मार्ट सारथी वेबसाइटवर उपलब्ध करण्यात येणार आहे.

याबाबत माहिती देताना आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, रस्त्यावर खाजगी वाहनांची संख्या वाढत असल्याने “गर्दी आणि प्रदूषणाची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे नागरिकांसाठी रस्ता सुरक्षा आणि सुलभतेच्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्येवर उपाय म्हणून नागरिकांना पादचारी आणि सायकल चालवण्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. ज्यामुळे अधिक लोकांना चालणे आणि सायकल चालविण्यास प्रोत्साहन मिळेल. तसेच, सार्वजनिक वाहतूक अधिक सुलभ होईल. “नॉन-मोटराईज्ड ट्रान्सपोर्ट पॉलीसी” हे धोरण चालणे आणि सायकलिंगसाठी अनुकूल पिंपरी-चिंचवड शहराचे स्वप्न साध्य करण्यात मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.