सामुहिक अत्याचार प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता

0
755
  • नौशाद शेख प्रकरणात अधिक खबरदारीची गरज

पिंपरी, दि. १४ (पीसीबी): अल्पवयीन मुलीला तिचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. याप्रकरणी अटकेत असलेल्या सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. चिंचवड पोलिसांनी याप्रकरणात केलेल्या तपासातील उणिवांवर बोट ठेवत न्यायालयाने निकाल दिला दिला. त्यामुळे शहरात नव्याने उघडकीस आलेल्या क्रिएटिव्ह अकॅडमीच्या नौशाद शेख प्रकरणात अधिक खबरदारीने तपास करण्याचे आव्हान रावेत पोलिसांसमोर आहे.

ऑगस्ट २०२१ मध्ये एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिचे व्हिडियो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा प्रकार चिंचवड पोलीस स्टेशन हद्दीत आनंदनगर भागात घडला असल्याचे नमूद होते.

गुन्ह्यातील पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीमध्ये त्यांच्याच भागात राहणाऱ्या एका बालगुन्हेगारासोबत पीडितेची प्रेमसंबंध होते. बालगुन्हेगाराने याचा गैरफायदा घेत पीडितेला धमकावत मुख्य आरोपी गौरव उर्फ नन्या वाघमारे याच्यासोबत जुळवून घे, नाहीतर तो तुला मारून टाकले अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या अल्पवयीन मुलींवर सलग एक वर्ष आरोपींद्वारे बलात्कार करण्याची घटना उघडकीस आली होती.

या गुन्ह्यात आरोपी व पीडिता हे एकाच भागातील रहिवासी आहेत. त्यामुळे पोलिसांमार्फत घटनेची गंभीर दखल घेत तपास पूर्ण केला असे सांगितले गेले होते. मात्र, या गुन्ह्यातील आरोपींची सबळ पुराव्याअभावी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाद्वारे निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामुळे चिंचवड पोलीस ठाण्यातील तत्कालीन अधिकाऱ्यांनी काय तपास केला हा सवाल आता उपस्थित होत आहे. त्याच बरोबर गंभीर गुन्ह्यातील तपासाबाबत देखरेख अधिकारी असणाऱ्या सहाय्यक पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी काय देखरेख केली हे देखील आता अति वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासण्याची गरज आहे.

सरकारी पक्षाद्वारे पीडितेची बाजू मांडल्यानंतर ऍड. नरेश शामनानी यांनी आरोपींची न्यायालयात बाजू मांडली. यामध्ये प्रामुख्याने पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे सरकारी पक्ष सिद्ध करू शकले नाही. तसेच बलात्काराच्या वेळी कुठलीही जखम पीडितेला झालेली नव्हती. तसेच बलात्कार झाल्याबाबत कुठलाही वैद्यकीय पुरावा सरकारी पक्ष देण्यास असमर्थ ठरला. व्हिडिओ दाखवून अत्याचार झाला हे तक्रारीत नमूद असताना जप्त मोबाईल मध्ये कोणताही व्हिडिओ शूट झाला नाही. तसेच कोणताही व्हिडिओ जप्त मोबाईल मधून डिलिट करण्यात आलेला नाही, असे प्रमाणपत्र शासनाच्या तांत्रिक न्याय वैद्यक प्रयोगशाळेने दिले. त्यामुळे व्हिडिओ दाखवून धमकावत अत्याचार करण्यात आला हे पोलिसांना सिद्ध करता आले नाही.

त्याचबरोबर पोलिसांनी नोंद केलेला घटनाक्रम, पीडिता व त्यांची आई यांच्या जबाबातील विसंगती बचाव पक्षाद्वारे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. बचाव पक्षाकडून केलेला युक्तिवाद आणि सादर केलेले उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे विविध न्यायनिवाडे ग्राह्य धरुन पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने यातील मुख्य आरोपी गौरव उर्फ नन्या वाघमारे याची बलात्कार व बाललैंगिक अत्याचारानुसार दाखल गुन्ह्यातुन सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

यामध्ये ऍड. नरेश शामनानी यांनी सांगितले की, कायद्याचा गैरफायदा घेऊन पोलिसांमार्फत तरुणांवर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्यामध्ये काल्पनिक घटनेचा आधार घेत यामध्ये तरुणाला अडकवण्याचा प्रयत्न झाला, ज्यात पोलिसांनी केलेल्या तपासातील त्रुटी, योग्य युक्तीवाद व उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे विविध न्यायनिवाडे यांच्या आधारे तरुणाला न्याय आम्ही देऊ शकलो. सदर गुन्ह्यात बचाव पक्षातर्फे ऍड. नरेश शामनानी, ऍड. अनिकेत खिलनानी, ऍड. दिव्या संहिता, ऍड. स्नेहा इदनानी आदींनी काम पाहिले.

नौशाद शेख प्रकरणात खबरदारीची आवश्यकता

रावेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत नुकताच क्रिएटिव्ह अकॅडमीचा संचालक नौशाद शेख याच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याने अनेक विद्यार्थिनींवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल होत आहेत. चिंचवड पोलीस ठाण्यातील तपासाचा अनुभव लक्षात घेता रावेत पोलिसांना नौशाद शेख प्रकरणात प्रत्येक बाबीचा सखोल तपास करावा लागणार आहे. नौशाद शेख प्रकरणातील तपासातील त्रुटी चिंचवड मधील गुन्ह्याची पुनरावृत्ती घडण्यासाठी कारणीभूत ठरू शकतील.