सामाजिक समरसता गुरुकुलमध्ये मिळणारे सर्वांगीण शिक्षण समाजाला प्रेरणा देईल, चंद्रशेखर बावनकुळे यांची चापेकर वाड्याला भेट

0
330

चिंचवड, दि. ७ मे २०२३ (पीसीबी) – क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलीत पुनरुत्थान समरसता गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण मिळत आहे. समाजाच्या तळागाळातील विद्यार्थ्यांना इथे उत्तम दर्जाचे शिक्षण दिले जात आहे. ही खरोखर प्रेरणा देणारी संस्था आहे, असे गौरवोद्गार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढले. गुरुकुल मधील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तू पाहून बावनकुळे हरखून केले.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी (दि. 7) क्रांतिवीर चापेकर वाड्याला आणि पुनरुत्थान समरसता गुरुकुलला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. क्रांतिवीर चापेकर वाड्यात भेट देऊन त्यांनी क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर वाड्यात सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय संग्रहालयाच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर बावनकुळे यांनी क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलीत पुनरुत्थान समरसता गुरुकुलला भेट दिली. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे त्यांनी कौतुक केले.

यावेळी प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश कार्यालय संघटनमंत्री रवी अनांसपुरे, आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी जगताप, आमदार उमा खापरे, माजी नगरसेवक शंकर जगताप, सरचिटणीस अमोल थोरात, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खडे, माजी नगरसेवक अमित गोरखे, चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, सहकार्यवाह रवींद्र नामदे, सदस्य गतीराम भोईर, मोरेश्वर शेडगे, अश्विनी चिंचवडे, नामदेव ढाके आदि उपस्थित होते.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीकडून गुरुकुल चालवले जात आहे. हे ईश्वरीय कार्य आहे. सरकारने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आता नवीन शैक्षणिक धोरण आणले आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे धोरण गुरुकुलमध्ये यापूर्वीच सुरु झाले आहे. गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांना संस्कार दिले जात आहे. त्यांच्यातील कलागुणांना वाव देऊन ते कलागुण विकसित करण्यासाठी इथे काम केले जात आहे. विद्यार्थ्यांचे हित जपणाऱ्या या गुरुकुलला आम्ही मदत करू असे आश्वासन देखील बावनकुळे यांनी दिले