सामाजिक संस्थांना दान करून स्वीकारली सेवानिवृत्ती

0
615

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – बालपणी घरातूनच मिळालेले सामाजिक बांधिलकीचे संस्कार आयुष्यभर जोपासत विविध सामाजिक संस्थांना आर्थिक साहाय्य करीत भास्कर रिकामे यांनी शुक्रवार, दिनांक ३० जून २०२३ रोजी कृतार्थ भावनेने सेवानिवृत्ती स्वीकारली. पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेमध्ये वैद्यकीय विभाग, मध्यवर्ती भांडार विभाग आणि जलशुद्धीकरण केंद्र येथे सुमारे चौतीस वर्षे सेवा करून भांडारपाल या पदावरून निवृत्त होताना निगडी प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या सभागृहात रिकामे यांच्या सहकारी, हितचिंतक, मित्रपरिवार आणि आप्तेष्टांनी हृद्य सोहळ्याचे आयोजन केले होते. माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर, भारती फरांदे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, शांताराम भालेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संपर्कप्रमुख मिलिंद देशपांडे, महापालिका जलशुद्धीकरण केंद्र कार्यकारी अभियंता संजय तूपसाखरे, महापालिका महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे, सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, डॉ. व्ही. जी. सावंत, डॉ. मनोज देशमुख, डॉ. सुहास माटे, अतुल आचार्य, रमेश बनगोंडे, सदाशिव रिकामे, शारदा रिकामे यांच्यासह प्रशासकीय, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती.

याप्रसंगी तळेगाव येथील इंद्रायणी सेवा समिती संचालित संपूर्ण निराधार अथवा एकल पालक असलेल्या मुलींचे संगोपन करणाऱ्या संजीवनी मुलींचे वसतिगृह या संस्थेच्या दिलीप देशपांडे यांना आर्थिक साहाय्य सुपुर्द करण्यात आले. महाराष्ट्र वनवासी कल्याण आश्रम संचालित हुतात्मा नाग्या कातकरी समाज विकास केंद्र आणि वसतिगृहाच्या पालक पदाधिकारी वैशाली जोशी यांच्याकडे मदतनिधी सोपविण्यात आला. पिंपळे गुरव येथील ममता अंध अनाथ कल्याण केंद्राचे मुख्य विश्वस्त चंद्रशेखर कदम यांच्याकडे अंध विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य सुपुर्द करण्यात आले. वय वर्षे शून्य तास ते सहा वर्षेपर्यंतच्या अनाथ बालकांचा सांभाळ आणि कायदेशीर पुनर्वसन करणाऱ्या आकुर्डी येथील आधार केंद्राचे पदाधिकारी शैलेश भिडे यांच्याकडे आर्थिक मदत सोपविण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातील धुमाळवाडी येथील धार्मिक उपासना आणि विद्यार्थ्यांसाठी संस्कारक्षम उपक्रम राबविणाऱ्या आनंद आश्रमाचे विश्वस्त दत्तात्रय धुमाळ यांनी आर्थिक देणगी स्वीकारली. या सर्व संस्थांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा निधी तसेच ज्या स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ या संस्थेच्या उभारणीपासून आजतागायतच्या वाटचालीत सक्रिय सहभाग घेतला त्या संस्थेला पाच हजार रुपयांचा निधी सुपुर्द केला.

यावेळी मान्यवरांच्या मनोगतांमधून भास्कर रिकामे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू लालित्यपूर्ण शैलीतून मांडण्यात आले. सत्काराला उत्तर देताना रिकामे यांनी, “दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदाचे सर्वत्र कौतुक होते; परंतु खालच्या सात-आठ थरांवरील गोविंदाच्या खांद्यावर उभा राहून त्याला हे यश मिळालेले असते. याप्रसंगी हीच कृतज्ञता माझ्या मनात आहे!” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. मनीषा हिंगणे आणि श्रीकांत मापारी यांनी सूत्रसंचालन केले.
माजी नगरसेवक प्रवीण भालेकर, नारायण बहिरवाडे, महेश्वर मराठे, डॉ. आनंद जगदाळे, प्रवीण लडकत, सुनील अहिरे, प्रशांत जगताप आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

सोहळ्याच्या समारोप प्रसंगी
उपस्थितांना स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या निसर्गमित्र विभागाच्या सहकार्याने पाच प्रकारच्या रोपांचे पर्यावरणपूरक पिशव्यांसह वितरण करण्यात आले.