सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांना व्याख्यानात धक्काबुक्की

0
262

नाशिक, दि. ४ (पीसीबी) सामाजिक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांच्या कार्यक्रमात हल्ला झाल्याची घटना घडली आहे. सिन्नरमध्ये सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित एका व्याख्यानात हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी स्वतः विश्वंभर चौधरी यांनी आपल्या ट्विटरच्या खात्याच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

नेमका काय प्रकार घडला?
विश्वंभर चौधरी एका व्याख्यानाच्या निमित्ताने सिन्नर येथे गेले होते, त्यांचं व्याख्यान सुरु असताना अचानक काही कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं तसेच त्यांच्या विरोधात घोषणा देत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. स्थानिक भाजप अध्यक्षांने चौधरी यांच्यासमोरील माईक उपटून फेकून दिला. त्याच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर तोडफोड केली तसेच एका कार्यकर्त्याने विश्वंभर चौधरी यांना धक्काबुक्की केली.

घडलेल्या प्रकारामुळे विश्वंभर चौधरी यांनी व्याख्यान रद्द करण्याचा निर्णय घेतला. “मला सिन्नरमधली कायदा आणि सुव्यवस्था मला बिघडवायची नव्हती. एक जबाबदार नागरिक म्हणून तेच माझं कर्तव्य आहे. अन्यथा पुरोगामी चळवळीतील कार्यकर्तेही आक्रमक झाले असते. अशा हल्ल्यांनी आम्ही घाबरणार नाही याची नोंद संबंधितांनी घ्यावी, असं विश्वंभर चौधरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

कोणी केला हा हल्ला? –

विश्वंभर चौधरी यांचं भाषण सुरु असताना अचानक गदारोळ झाला. यामध्ये भाजप तसेच भाजपशी संबंधित संघटनांचे पदाधिकारी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्वतः विश्वंभर चौधरी यांनी आपल्या ट्विटमध्ये याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

ते म्हणाले, “आज सिन्नरला व्याख्यान सुरु झाल्यानंतर काही मिनिटातच स्थानिक भाजपा अध्यक्ष, रा.स्व. संघ, बजरंग दलाचे कार्यकर्ते विनाकारण आक्रमक झाले आणि भाषण बंद करा, राम नवमीला डीजे का वाजवायचा नाही?, असे प्रश्न ओरडून विचारायला लागले. यापैकी कोणालाही मी ओळखत नाही. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार ते भाजप, रा.स्व. संघ आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते होते.”

विश्वंभर चौधरी यांच्यावरील हल्ल्याचा आता पुरोगामी वर्तुळातून निषेध केला जात आहे. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी एक जळजळीत ट्विट केलं आहे. “सिन्नर येथील विश्वंभर चौधरी यांच्या निर्भय बनो सभेत गुंडगिरी करणाऱ्या डरपोक भाजप आणि संघ कार्यकर्त्यांचा निषेध.आजच्या विजयाने माज वाढला काय?”, असा सवाल त्यांनी केला आहे