– श्री बालाजी युनिर्व्हसिटी येथे आयोजित ‘लक्ष्यवेध’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन
– स्टार्टअप उपक्रमांला चालना देण्यासाठी स्मार्ट सिटी आणि श्री बालाजी युनिर्व्हसिटी यांच्यात सामंजस्य करार
पिंपरी, दि. २३ (पीसीबी) : समाजामध्ये प्रत्येक घटकांचा विकास हा समतोल होणे आवश्यक आहे. सर्वांना रस्ते, पाणी इत्यादी मुलभूत सेवा मिळायलाच पाहिजेत. शाश्वत विकासाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन सर्वांनी काम करणे आवश्यक असून विद्यार्थी जिवनापासूनच व्यक्ती, समाज आणि देश म्हणून आपण ज्या प्रश्नांना सामोरे जात आहोत, त्यावर आधारित कार्यक्षेत्र निवडल्यास आर्थिक प्रगती बरोबरच सामाजिक विकास देखील होईल, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी केले.
मूलभूत सेवा देतानाच अत्याधुनिक तंत्रज्ञानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यामुळे पायाभूत सुविधा पुरवणे आणि त्याच बरोबर नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा उपयोग करून नवे प्रकल्प कार्यान्वित करणे गरजेचे आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
युवकांमध्ये उद्योजक बनण्याची प्रेरणा निर्माण व्हावी, यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत, त्याअनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका, स्मार्ट सिटी आणि श्री बालाजी युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ताथवडे कॅम्पस येथे गुरुवारी ‘लक्ष्यवेध’ उपक्रमांतर्गत आयोजित ‘स्टार्टअप उद्योजक’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी, एसबीयुपीचे प्र-कुलगुरू आणि एसबीएसचे अध्यक्ष प्रा. बी. परमानंदन, मनपा माहिती व जनसंपर्क विभाग प्रमुख रविकिरण घोडके, रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे विभाग प्रमुख डॉ. अनिल केसकर, रिसर्च अँड डेव्हलपमेंट उपविभाग प्रमुख डॉ. मनीषा पालीवाल, अस्पायर नॉलेज अँड स्किल्स इंडियाचे अध्यक्ष डॉ. संजय गांधी, बीआयएस ध्रुव व्हेंचर्सचे किशोर मिश्रा यांच्यासह स्मार्ट सिटीचे जनसंपर्क अधिकारी सोयम अस्वार, स्मार्ट सारथी टीमचे अभिजित पाठक, बिनिश सुरेंद्रन, आशिष चिकणे, जस्टीन मॅथ्थेव्ह, राहूल थोरात तसेच विद्यार्थी, प्राध्यापक आदी मोठया संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते उद्योजकता विकास कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि श्री बालाजी युनिव्हर्सिटी यांच्यात सिटीझन इंगेजमेंट, स्टार्टअप उपक्रमांविषयी च्या सामजंस्य करारावर स्वाक्ष-या करण्यात आल्या. डॉ. अनिल केसकर यांनी प्रास्ताविक केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि श्री बालाजी युनिव्हर्सिटी यांनी एकत्रितपणे सुरु केलेल्या उपक्रमाची त्यांनी माहिती दिली. श्री. गांधी यांनी विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण संकल्पनांच्या आधारे स्टार्टअप सुरु करावेत, असे आवाहन केले. मनोज मिश्रा यांनी स्टार्टअप्सकरिता उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या आर्थिक, कायदेशीर आणि अन्य सहाय्यतेविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांचे निराकरण यावेळी करण्यात आले.











































