साताऱ्यात माझा विजय पक्का आहे : शशीकांत शिंदे

0
188

सातारा, दि. १० (पीसीबी)- साताऱ्यामधून राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाकडून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांची उमेदवारी घोषित होताच माथाडी कामगारांकडून नवी मुंबईत त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी शिंदे यांनी तुतारी वाजवत लढाईला सज्ज असल्याचा इशारा दिला . दोन्ही राजे माझ्यासमोर असले तरी साताऱ्याची जनता माझ्याबरोबर आहे. त्यामुळे शरद पवारांच्या विचाराचा विजय होणार असल्याचा विश्वास शशीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

शशीकांत शिंदे म्हणाले, सातारा लोकसभेत मला उमेदवारी देवून माझ्या गुरूने परत एकदा शिष्यावर विश्वास दाखवला आहे. पाच वेळा आमदार केले, मंत्री केले आणि आता सातारामधून लोकसभेची उमेदवारी दिल्याने निष्ठावान कार्यकर्त्यांचा हा विजय आहे. सातारा लोकसभेत नक्कीच राष्ट्रवादीचा, शरद पवारांच्या विचाराचा विजय होणार आहे. दोन्ही राजे समोर असले तरी माझ्या बरोबर सातारची जनता आहे.

माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील भाजपात असले तरी माथाडी कामगार माझ्यावर विश्वास ठेवून माथाडी नेत्याला दिल्लीत पाठवतील. सातारच्या जनतेला माहित आहे सभागृहात आवाज उठवून साताऱ्यासाठी कोण प्रकल्प घेवून येणार, त्यामुळे माझा विजय पक्का आहे, असे शशीकांत शिंदे म्हणाले.

शशीकांत शिंदेंचे नवी मुंबईत त्यांचं जोरदार स्वागत
साताऱ्यामधून राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाकडून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांची उमेदवारी घोषित होताच माथाडी कामगारांकडून नवी मुंबईत त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं.. एपीएमसी मार्केट मध्ये शिंदे यांचे स्वागत करण्यात आले. फटाके फोडून , ढोलताशे वाजवत माथाडी कामगारांनी स्वागत केले.

शरद पवारांचा बालेकिल्ला, मात्र उमेदवार ठरत नव्हता
सातारा हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा बालेकिल्ला आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सातारा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार सातत्याने निवडून येतोय. गेल्या लोकसभेच्या वेळी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आलेल्या उदयनराजेंनी चारच महिन्यात राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत साताऱ्यातील मतदारांनी उदयनराजेंच्या भूमिकेला मान्यता न देता राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटलांना पसंती दिली. यंदाच्या निवडणुकीत खासदार श्रीनिवास पाटील यांनी तब्येतीच्या कारणास्तव निवडणूक लढण्यास नकार दिला आणि त्यांचे पुत्र सारंग पाटील यांचे नाव पुढे केले. त्याचसोबत कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील आणि पाटणचे सत्यजितसिंह पाटणकरांचं नावही चर्चेत आलं.