महाविकास आघाडीकडून साताऱ्यात पृथ्वीराज चव्हाण लढणार असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान शरद पवार यांनी आदेश दिल्यास साताऱ्यातून निवडणूक लढणार असल्याचे चव्हाण यांनी म्हटले तर प्रकृतीच्या कारणामुळे श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवण्यास नकार देत माघार घेतली आहे. त्यामुळे उदयनराजे भोसलेंना साताऱ्यातून पृथ्वीराज चव्हाण आव्हान देऊ शकतात. साताऱ्यात महाविकास आघाडीची जागा शरद पवार गटाकडे आहे. मात्र मला सांगितल्यास मी लढण्यास तयार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
दरम्यान, श्रीनिवास पाटलांनी माघार घेतल्यास शरद पवार यांना आता उमेदवार द्यावाच लागेल. त्यामुळेच भिवंडीच्या जागी सातारा काँग्रेसला देऊन पृथ्वीराज चव्हाणांसारखा तगडा उमेदवार दिला जाऊ शकतो. एकीकडे पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू असताना भाजपकडून मात्र उदयनराजेंच्या नावावर अद्याप अंतिम शिक्कामोर्तब झालेलं नाही. चव्हाण यांच्यासारखा तगडा उमेदवार समोर आला तर उदयनराजे यांच्या नावावर फूली पडणार अशी चर्चा आहे.