साताऱ्याच्या कास पठारावरील हॉटेलात बारबालांसह रेव्ह पार्टी

0
41

सातारा,दि. 12 (पीसीबी) : सध्या मोठ्या शहरांमध्ये रेव्ह पार्ट्या, रंगीत-संगीत पार्ट्यांचे पेव्ह फुटले आहे. अनेकदा पोलिसांकडून अशा पार्ट्यांवर छापा टाकून कारवाई केली जाते, तर कधी अशा पार्ट्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष देखील होते. त्यामुळे, महिला नाचवत किंवा बारबाला घेऊन काही ठिकाणी पार्ट्या केल्या जातात. दरम्यान, सातारा जिल्ह्यातही अशाच एका रेव्ह पार्टीचा भांडाफोड झाला असून सोशल मीडियावर या पार्टीचे फोटो व्हायरल झाले आहेत. साताऱ्याच्या कास पठारावरील एका हॉटेलमध्ये बारबालांसह ही रेव्ह पार्टी रंगली होती. या रेव्हपार्टी दरम्यान झालेल्या भांडणात 3 जण जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र, कुठलीही पोलीस कारवाई नसल्याने या पार्टीला सातारा पोलिसांचा आशिर्वाद आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

साताऱ्यातील कास परिसरात एका हॉटेलवर नुकतीच एक रेव्ह पार्टी झाली. या रेव्ह पार्टीत बारबाला देखील नाचवल्या गेल्या आहेत. पार्टीत दारू पिऊन धिंगाणा घालतानाचे, बारबालांसोबत अश्लील नृत्य करतानाचे व्हिडिओ सध्या सोशलमिडियावर व्हायरल होत आहेत. महत्वाचे म्हणजे या रेव्ह पार्टीनंतर या ठिकाणी वाद होऊन राडा देखील झाला आहे. त्यामध्ये, तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र, या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. साताऱ्यातील रेव्ह पार्टीच्या या घटनेचे व्हिडिओ तीन दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत असतानाही पोलिसांनी सपशेल डोळेझाक केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, पोलिसांनी अर्थपूर्ण दुर्लक्ष केलंय हा अशी शंका उपस्थित होत आहे.

दरम्यान, याबाबत सातारा पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याशी संपर्क साधल्यानंतर प्रकरणाची चौकशी सुरू करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे, पोलीस चौकशीतून काय बाहेर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच, पोलीस तपास किती जलद गतीने होतो हेही पाहावे लागणार आहे.