दहा वर्षातले भोसरीतले 184 सातबारा उतारे मी पाहिले…
भोसरी, दि. १८ (पीसीबी) – गेल्या दहा वर्षातले भोसरीतले 184 सातबारा उतारे मी पाहिले आणि तेव्हा माझी खात्रीच पटली की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रविवारी भोसरीमध्ये खरेच बोलले. योगी आदित्यनाथ म्हटल्याप्रमाणे” इनका नारा सबका साथ और सिर्फ परिवार का विकास” असेच चित्र भोसरी विधानसभा मतदारसंघात आहे. म्हणूनच तुतारी अशी वाजवा की कमळाची पाकळी शिल्लक राहू नये असे सांगतानाच ‘सातबारा’वरची ताबेमारी आता पाठवा घरी” असे आवाहन देखील डॉ. कोल्हे यांनी केले.
महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे भोसरी मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ चिखली येथे शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी माजी नगरसेवक उपस्थित होते.
डॉ कोल्हे पुढे म्हणाले, भोसरी मतदारसंघांमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा झाली त्यामुळे मी बोलणे फार गरजेचे होते. योगी आदित्यनाथ या सभेत बोलताना म्हणाले “इनका नारा सबका साथ और सिर्फ परिवार का विकास ” पण त्यानंतर मी हे 184 सातबारा पाहिले तेव्हा योगी आदित्यनाथ यांचे बोलणे मला शब्दश: पटले. हे सातबारा पाहिल्यानंतर ” इनका एक ही नारा कॉन्ट्रॅक्टर का साथ और सिर्फ परिवार का विकास” अशी स्थिती आहे. म्हणूनच भोसरी मतदारसंघांमध्ये ” तुतारी वाजवा, सातबारा वाचवा, तुतारी वाजवा भोसरी वाचवा” ही महत्त्वाची गोष्ट भोसरीकरांनी मनावर घेतली आहे.
मागील सभेमध्ये मी बकासुराची गोष्ट येथील नागरिकांना सांगितली होती असे सांगून डॉ. कोल्हे म्हणाले, पुराणातील ही कथा आज काहींची प्रवृत्ती बनली आहे. या प्रवृत्तीला नष्ट करणे गरजेचे आहे .म्हणून येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांचे “तुतारी वाजवणारा माणूस” या चिन्ह समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचे आहे.
डॉ. कोल्हे म्हणाले मी वैयक्तिक टीका कधीच करत नाही. पण विद्यमान आमदार व्यासपीठावरून वीस तारखे नंतर बघून घेतो अशी जर भाषा वापरत असेल तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देणे गरजेचे आहे. माझ्या माता माऊली घरातल्या प्रत्येक मुलाला सांगत असतात “उतू नको मातू नको, कारण उतमात केल्यानंतर गर्वाचे घर हे नक्की खाली येत असते.
भाजपने महाराष्ट्राच्या राजकारणाला गालबोट लावले
खासदार डॉ.अमोल कोल्हे म्हणाले ,भाजपने महाराष्ट्राच्या राजकारणाला गालबोट लावण्याचे काम केले. आतापर्यंत आपल्याला चप्पल ,शर्ट विकत घेता येतो. हे माहीत होते परंतु भाजपने 50 खोके देऊन आमदार विकत घेतले. भाजपने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना आणि शरदचंद्रजी पवार साहेबांनी निर्माण केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. हे विकले गेले आणि आपल्याला नैतिकतेच्या गोष्टी शिकवतात. दिवसेंदिवस महागाई प्रचंड वाढत आहे. महाराष्ट्रातले आठ शेतकरी दररोज आत्महत्या करतात. 200 शेतकऱ्यांच्या तिरडी महिन्याला उचलावी लागते. यांना विकासावर काहीच बोलता येणार नाही. लोकसभेत महाराष्ट्राने यांना हद्दपार केले म्हणूनच यांना लाडकी बहीण आठवली.