पिंपरी-चिंचवड दि. २ ऑगस्ट (पीसीबी) – घराजवळ खेळत असलेल्या साडेतीन वर्षीय मुलीच्या अंगावर लोखंडी गेट पडले. यात मुलीचा मृत्यू झाला. बोपखेल येथे बुधवारी (दि. ३१ जुलै) रोजी दुपारी चारच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.गिरीजा गणेश शिंदे (रा. जिजाई निवास, गणेश नगर नंबर २, बोपखेल), असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. गिरीजाचे वडील गणेश लक्ष्मण शिंदे हे खासगी नोकरी करतात. बुधवारी दुपारी कामावरून परतल्यानंतर गणेश हे घरात विश्रांती घेत होते. त्यावेळी गणेश यांचे वडील लक्ष्मण शिंदे, आई सुरेखा, पत्नी गार्गी आणि त्यांची दोन वर्षांची लहान मुलगी आदी घरात होते. दरम्यान, त्यांची साडेतीन वर्षांची मुलगी गिरीजा ही घराबाहेर इतर लहान मुलांसोबत खेळत होती. एका इमारतीच्या गेटजवळ तेथेच राहणारा लहान मुलगा खेळत होता. तेव्हा अचानक हे लोखंडी गेट गिरीजाच्या अंगावर पडले. गेटखाली पूर्णपणे दबल्याने गिरीजा गंभीर जखमी झाली. गेट पडल्याचा आवाज झाल्याने इतर लहान मुले प्रचंड घाबरली. एकच गलका झाला. गेट पडल्याबाबत एका मुलीने क्षणाचाही विलंब न करता
गणेश यांना सांगितले. गणेश हे घरातून धावत आले. त्यांनी गेट बाजूला केले. जखमी गिरीजाला उचलून रुग्णालयात धाव घेतली. पिंपरी येथील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात तिला दाखल केले. मात्र, तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले. याबाबत माहिती मिळताच दिघी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.गणेश शिंदे यांच्या घराशेजारी असलेल्या इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार पडून ही दुर्घटना घडली. या लोखंडी प्रवेशद्वाराच्या सुरक्षेबाबत पुरेशी खबरदारी घेतली असती तर दुर्घटना टळली असती आणि चिमुरड्या गिरीजाचा जीव गेला नसता, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.गिरीजा आणि इतर लहान मुले खेळत असून त्यावेळी गेट पडल्याची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. अंगावर शहारे आणणारा हा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. नातेवाईकांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.