सागर तापकीर यांच्या खांद्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहर कार्यध्यक्षपदाची धुरा

0
332

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – काळेवाडी-रहाटणी येथील युवा नेते सागर मच्छिंद्र तापकीर यांच्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरद पवार गट) पिंपरी चिंचवड शहराच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या हस्ते सागर तापकीर यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी शरद पवार गट राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष इम्रान शेख, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, शहर निरीक्षक प्रकाश म्हस्के, शहराध्यक्ष तुषार कामठे, महिलाध्यक्षा ज्योती निंबाळकर, राहुल आहेर, ओबीसी सेलचे अध्यक्ष विशाल जाधव यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना सागर तापकीर म्हणाले की, ज्या ज्या वेळी महाराष्ट्र संकटात सापडला, त्या त्या वेळी शरद पवार हे पहाडासारखे या संकटासमोर उभे राहून त्यांनी आपल्या महाराष्ट्राला प्रगतीची नवी दिशा दिली. पिंपरी चिंचवड शहराला जगभरात नावलौकिक मिळवून देण्याचे काम त्यांनी केले. मात्र आज ज्यांना पवार साहेबांनी हाताचा आधार देऊन वर आणले तेच लोक सगळं विसरून शरद पवार यांच्यावरच उलटले. मात्र आमच्यासारखे निष्ठावंत कार्यकर्ते शेवटपर्यंत पवार साहेबांच्या सोबत आहोत आणि राहू. आणि साहेबांच्या स्वप्नातील नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी कार्य करू. तसेच आगामी सार्वत्रिक निवडणुकीत महापालिकेवर शरद पवार गटाचा झेंडा फडकवू, असा विश्वास तापकीर यांनी यावेळी व्यक्त केला.सागर तापकीर यांचे वडील मच्छिंद्र तापकीर हे पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते तर आई अनिता तापकीर या माजी नगरसेविका आहेत. त्यामुळे त्यांना राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले असून पुढील काळात त्यांच्या अनुभवाचा सागर यांना निश्चित फायदा मिळेल.