सागरमाथा गिर्यारोहण संस्थेची गिर्यारोहण प्रशिक्षण, दुर्गभ्रमंती

0
8

भोसरी, दि.25 (पीसीबी)
सागरमाथा गिर्यारोहण संस्थेच्या वतीने दरवर्षी गिर्यारोहण प्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण, दुर्गभ्रमंती मोहिमा राबविण्यात येतात. संस्थेचे संस्थापक कै. रमेश गुळवे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रतिवर्षी ‘रमेश गुळवे स्मृती सामाजिक पुनरुत्थान उपक्रम’ (RMARC) वेगवेगळ्या गडकिल्ल्यांवर राबविण्यात येतो. संस्थेचा “आरमार्क” या अभिनव उपक्रमाच्या अंतर्गत मुळशी तालुक्यातील किल्ले कोरीगड, येथील आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी समाजप्रबोधपर व्याख्यान, यशवंत ग्रंथदिंडी प्रदान सोहळा व दुर्गभ्रमंती मोहिम यशस्वीपणे राबविण्यात आली असे आरमार्क उपक्रम समन्वयक श्री प्रकाश ढमाले व श्रीकांत जाधव यांनी यावेळी सांगितले.

सागरमाथा गिर्यारोहण संस्थेच्या माध्यमातून दहा वर्षे गिर्यारोहण क्षेत्रामध्ये कार्य व विविध मोहिमांच्या बरोबरच सामाजिक जबाबदारीच्या जाणीवेतून संस्थेचे संस्थापक दिवंगत रमेश गुळवे यांच्या स्मरणार्थ विविध उपक्रम राबवले जातात. यावर्षी दोन दिवसीय उपक्रमाच्या माध्यमातून दि २१ डिसेंबर रोजी किल्ले कोरीगड येथे सागरमाथाचे सदस्य व आकुर्डी येथील डॉ डी वाय पाटील आर्टस् कॉमर्स व सायन्स कॉलेज चे राष्ट्रीय सेवा योजनेच्या ५५ विद्यार्थ्यांसह श्रमदान व दुर्ग स्वच्छता अभियान पुर्ण करण्यात आले. यासाठी प्राचार्य डॉ. श्री. वामन सर व एन. एस. एस. उपक्रम अधिकारी डॉ श्री खालीद सर यांचे सहकार्य लाभले. याच दिवशी स्थानिक गावातील ग्रामस्थ व युवकांसाठी ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक, पक्षीतज्ञ तसेच जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष श्री यश मस्करे सर यांचे ‘सह्याद्रीतील जबाबदार पर्यटन व युवकांना रोजगाराच्या संधी’ याविषयी समाजप्रबोधनपर व्याख्यान झाले. युवकांसाठी नव्या पर्यटन विश्वातील विविध संधी व सह्याद्रीतील जबाबदार पर्यटन या विषयावर श्री यश मस्करे सर यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.

२२ डिसेंबर रोजी सकाळी सह्याद्रीच्या दुर्गम आदिवासी गावांतील जि प प्रा शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सागरमाथा च्या वतीने वाचन संस्कृती वाढ होण्यासाठी ग्रंथदान करण्याचा अभिनव उपक्रम अर्थात यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सन्मानार्थ यशवंत ग्रंथदिंडी सोहळा साजरा करण्यात आला.
शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना गडकिल्ल्यांची आवड निर्माण व्हावी, सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर भटकंतीची गोडी लागावी, त्यांची निसर्गाशी मैत्री व्हावी आणि ऐतिहासिक गडदुर्गांची जपणूक व्हावी यासाठी सागरमाथा गिर्यारोहण संस्था गेली अनेक वर्षे प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. त्यासाठी संस्थेच्या वतीने अनेकविध उपक्रम राबविण्यात येतात. त्यातीलच एक उपक्रम म्हणजे गडदुर्गांच्या पायथ्याशी असणाऱ्या गावातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी ग्रंथदिंडी काढून विविध प्रकारची वाचनीय पुस्तके त्यांना वाटण्यात येतात. गडकिल्ले पहायला जाताना सह्याद्रीच्या कुशीतील या रानपाखरांची गरज लक्षात घेऊन, सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून संस्थेने हा आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. गेली १२ वर्षे पुणे जिल्ह्यातील राजमाची, लोहगड-विसापुर,सिंहगड, ,सिंहगड, ,सिंहगड, पुरंदर, घनगड, हडसरगड, निमगिरी, सिंदोळा, चावंड या किल्ल्यांच्या पायथ्याशी असलेल्या गावांतील रानपाखरांना अर्थात छोट्या विद्यार्थ्यांना अशी हजारो पुस्तके या संस्थेने आतापावेतो वाटली आहेत.
महाराष्ट्राचे शिल्पकार कै. यशवंतराव चव्हाण यांनी शिक्षणासह कला, साहित्य, संस्कृतीसाठी विशेष प्राधान्य दिले होते. त्यांची स्मृती म्हणून या उपक्रमास ‘यशवंत ग्रंथदिंडी’ असे नामाभिधान देण्यात आले आहे. मुलांसाठी उपयुक्त माहिती, संस्कार, ज्ञान, विज्ञान, कथा अशी वाचनीय पुस्तके या ग्रंथदिंडी च्या माध्यमातून देण्यात आली. किल्ल्याच्या पायथ्याच्या दुर्गम गावातील शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन, तेथील गावकऱ्यांच्या सहकार्याने गावातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. अनेक दुर्गप्रेमी मान्यवर त्यामध्ये सहभागी झाले होते. एका शानदार समारंभात पुस्तक वाचनाचे महत्त्व पटवून देऊन, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ही पुस्तके शाळेकडे प्रदान करण्यात आली .यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत श्री अरूण बोऱ्हाडे हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते व या कार्यक्रमसाठी सामाजिक कार्यकर्ते श्री अशोक रानवडे, आंतरराष्ट्रीय एआय तज्ञ डॉ श्री अमित आंद्रे सर,श्री यश मस्करे सर, डॉ प्रा. श्री राधाकृष्ण गायकवाड सर, श्री विनोद वाळके सर, श्री शशिकांत पठारे सर, युवा उद्योजक तुषार तापकीर, ज्ञानेश्वर मुंगसे, निलेश बधाले, श्री अनिल दुधाने हे उपस्थित होते. शालेय पुस्तकांशिवाय अवांतर ज्ञानाची कवाडे उघडण्याचा हा आगळावेगळा प्रयत्न सागरमाथा गिर्यारोहण संस्था करीत आहे, इतिहास घडवताना आज राष्ट्रमाता जिजाऊ, महाराणी येसूबाई, महाराणी ताराराणी या पराक्रमी महिलांचा आदर्श आधुनिक युगात मुलींना घ्यावा असे श्री अरूण बोऱ्हाडे यांनी प्रतिपादन केले.

यानंतर दुर्गमहर्षी प्रमोद मांडे स्मृती दुर्गभ्रमंती मोहिम कोरीगड किल्ल्याच्या पायथ्यापासून सुरू झाली. या उपक्रमात दिघी येथील रामचंद्र गायकवाड विद्यालय व ज्युनियर कॉलेज चे विद्यार्थ्यी व मोठ्या संख्येने गिर्यारोहक सहभागी झाले. दुर्गसंवर्धन व दुर्ग वाचन ज्येष्ठ शिलालेख, वीरगळ व सतीशिळा अभ्यासक श्री अनिल दुधाने सर यांनी गडाचे ऐतिहासिक महत्त्व, भौगोलिक रचना आणि स्थापत्य विषयक माहिती सांगितली.
या दोन दिवसीय उपक्रमासाठी आंबवणे गावच्या सरपंच सौ. सीताताई कराळे, माजी सरपंच श्री मच्छिंद्रशेठ कराळे व ग्रामपंचायत सदस्य शरद जगताप यांनी सहकार्य केले.
या उपक्रमात नारद गुळवे, गडकिल्ले सेवा संस्थेचे सचिव अजय सोनवणे, अॅड सुनिल कदम, इत्यादी मान्यवर सहभागी झाले होते.
सागरमाथा गिर्यारोहण संस्थेच्या वतीने संस्थेचे कार्याध्यक्ष संयोजक एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर यांच्यासह उपक्रम समन्वयक म्हणून प्रकाश ढमाले, श्रीकांत जाधव व सुमित दाभाडे होते. संस्थेचे अध्यक्ष प्रविण हरपळे यांनी मार्गदर्शन केले