‘प्रयोग कला सन्मान’ पुरस्काराने
दिशा सोशल फाऊंडेशनचा गौरव
थिएटर वर्कशॉप कंपनी व पैस कल्चरल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पिंपरी पालिकेच्या सहकार्याने आयोजित ‘रंगानुभूति: पूर्वरंग ते उत्तररंग’ नाट्य प्रयोग कला महोत्सव २०२५” मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध १० संस्थांचा ‘प्रयोग कला सन्मान’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
दिशा सोशल फाऊंडेशन, टेल्को कलासागर, अखिल भारतीय नाट्य परिषद पिंपरी- चिंचवड शाखा, अथर्व थिएटर, कलापिनी-तळेगाव दाभाडे, नाटकघर, द बॉक्स, आसक्त, महाराष्ट्र कल्चरल सेंटर, सुदर्शन रंगमंच, संस्कार भारती यांचा सत्कारार्थी संस्थांमध्ये समावेश होता.
विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, पिंपरी पालिका आयुक्त शेखर सिंह, राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे, माजी नगरसेवक राजू मिसाळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचे प्रमुख प्रवीण भोळे, पैस रंगमंचचे संस्थापक प्रभाकर पवार, समन्वयक अमृता ओंबळे आदी उपस्थित होते. दिशाचे उपाध्यक्ष संतोष बाबर, सचिन साठे, अविनाश ववले, राजेंद्र साळुंके यांनी पुरस्कार स्वीकारला.
यावेळी अजित पवार म्हणाले की, उदयन्मुख कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी नाट्यमहोत्सवातून संधी मिळाली आहे. पिंपरी चिंचवडची आता सांस्कृतिक शहर अशी ओळखही निर्माण झाली आहे. अनेक कवी, लेखक, साहित्यिक, अभिनेते या शहरात घडले असून यापुढेही घडत राहतील. या सर्वांमुळे शहराचा नावलौकिक वाढला आहे. सरकार म्हणून सांस्कृतिक, कला, साहित्य क्षेत्राला शक्यतो सर्व मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे.