सांगवीतील वाहन तोडफोड प्रकरणी एकाला अटक

0
118

सांगवी, दि. २६ (पीसीबी) : सात वाहनांची तोडफोड करणा-या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सांगवी येथे मंगळवारी (दि. 24) रात्री साडेअकरा वाजताच्‍या सुमारास घडली.

निखील संजय तोडकर (वय 31, रा. कवडेनगर पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार निहाल ऊर्फ सोन्या संजय पवार (वय 29, रा. जय महाराष्ट्र चौक, फुगेवाडी) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपी निहाल पवार हा मंगळवारी रात्री साडेअकरा वाजताच्‍या सुमारास मयुरनगर, पिंपळे गुरव येथे वाहनांची लाकडी दांडक्‍याने तोडफाेड करीत होता. त्‍यावेळी फिर्यादी निखील तोडकर हे आरोपीकडे पाहत होते. आरोपी निहाल हा फिर्यादी यांना उद्देशून म्‍हणाला की, तु का माझ्याकडे बघतो, मला ओळखले का, मी निहाल पवार आहे, मी फुगेवाडीचा भाई हाय, असे बोलून आरोपीने त्याच्‍या हातातील लाकडी दांडके फिर्यादी निखील यांच्‍या दिशेने फेकून मारले. फिर्यादी यांनी ते चुकविले. लाकडी दांडके फिर्यादी यांच्‍या डोक्यास लागले असते तर त्‍यांना गंभीर दुखापत होवुन त्‍यांचा जीवही गेला असता, याची आरोपीला जाणीव असताना देखील आरोपीने जाणीवपूर्वक लाकडी दांडके फिर्यादीच्या दिशेने फेकुन मारले. तसेच परिसरातील सात वाहनांची तोडफोड केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.