सहा महिन्यांनी देशात एक मोठा राजकीय भूकंप – नरेंद्र मोदी

0
125

लोकसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. शेवटच्या टप्प्यात उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालसह इतर आठ राज्यांमधील एकूण ५७ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. दरम्यान, मोदी यांनी बुधवारी (२८ मे) पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा या मतदारसंघात भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित प्रचारसभेला संबोधित केलं. यावेळी मोदी म्हणाले, “भाजपाला यंदा बंगालमध्ये मोठा विजय मिळेल. मागील निवडणुकीपेक्षा यंदा भाजपा बंगालमध्ये खूप जागा जिंकेल.”

नरेंद्र मोदी या प्रचारसभेत मतदारांना उद्देशून म्हणाले, “तुमचं एक मत देशाची दिशा बदलू शकतं. ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेल आणि त्यानंतर सहा महिन्यांनी देशात एक मोठा राजकीय भूकंप होईल. घराणेशाहीचं राजकारण घेऊन पुढे चाललेले अनेक पक्ष नष्ट होतील.” मोदींनी यावेळी नेमकं सहा महिन्यांनी काय होईल याबाबत कोणतेही संकेत दिले नाहीत. परंतु, त्यांनी बंगालमध्ये हे भाषण केल्यामुळे त्यांचा रोख ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाकडे असावा, असं बोललं जात आहे. तर काही राजकीय विश्लेषक याचे वेगळे अर्थ लावत आहेत.

नरेंद्र मोदी हे विरोधी पक्षांवर सातत्याने घराणेशाहीचे आरोप करत असतात. ते अधून-मधून काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक), तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल या पक्षांवर आणि पक्षांच्या प्रमुखांवर घराणेशाहीचे आरोप करत असतात. अशातच त्यांनी घारणेशाही असलेले पक्ष नष्ट होतील असं वक्तव्य केल्यामुळे हे वक्तव्य या सर्व पक्षांबाबत होतं का? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.

दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, “तृणमूल काँग्रेसने बंगालला विकासापासून वंचित ठेवलं आहे. लोकांनाही आता जाणीव झाली आहे की, पूर्ण ईमानदारीने देशाचा विकास कोणी करू शकत असेल तर ती भारतीय जनता पार्टी आहे. त्यामुळे मी बंगालमधील मतदारांना आवाहन करतो की तुम्ही तुमच्या राज्यात भाजपाला मजबूत करा, त्यानंतर भाजपा तुमची प्रत्येक अपेक्षा पूर्ण करेल.”

मोदी यांनी यावेळी इंडिया आघाडीवर तुष्टीकरणाचे आरोप केले. ते म्हणाले, “बंगालमधील तृणमूल सरकार काही ठराविक लोकांच्या तुष्टीकरणासाठी संविधानावर हल्ला करत आहे. आपल्या संविधानाने दलितांना आणि मागासवर्गीयांना आरक्षण दिलं आहे. मात्र बंगालमध्ये त्या आरक्षणावर दरोडा टाकण्यात आला आहे. दलित आणि मागासवर्गीयांचं आरक्षण लुटून ते मुसलमानांना दिलं आहे. बंगालमधील सरकारने मुसलमानांना खोटी ओबीसी जातप्रमाणपत्रं देऊन त्यांचा ओबीसीत समावेश केला आहे. तुष्टीकरणासाठी हे लोक कुठपर्यंत जाऊ शकतात त्याचा एकदा विचार करा. १ जून रोजी तुम्ही दिलेलं एक मत या राज्यावरील धोकादायक संकट टाळू शकतं.”