पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम 2009 अंतर्गत अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी महापालिका प्रशासनास प्राप्त झालेल्या 1 हजार 409 अर्जावर प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाली आहे. पुढील सहा महिन्यांमध्ये अर्जदार नागरिकांना गुंठेवारीअंतर्गत बांधकामे नियमित केल्याचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
शहरातील 31 डिसेंबर 2020 पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी पालिकेने 20 डिसेंबर 2021 ते 30 जून 2022 या सहा महिन्यांच्या कालावधीत अर्ज स्वीकारले. या मुदतीमध्ये एकूण 1 हजार 409 अर्ज प्राप्त झाले. प्राप्त अर्जावर बांधकाम परवानगी विभागाच्या वतीने कार्यवाही केली जाणार आहे. त्यासाठी महापालिका भवनात शहर अभियंता मकरंद निकम यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. या बैठकीला अभियंते, उपअभियंते, प्रभाग अधिकारी, सर्व्हेअर उपस्थित होते. गुंठेवारीनुसार बांधकामे नियमित करण्यासाठीची कार्यवाही सुरू करण्याबाबत त्यात सूचना देण्यात आल्या. गुंठेवारीचे कामकाज कशा प्रकारे करायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले.
अर्जदारांच्या घरांला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली जाणार आहे. त्यांच्या शिफारशीनुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे. त्यानंतर कागदपत्रांमध्ये त्रुटी असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी अर्जदाराला कळविले जाणार आहे. अर्जदाराने आवश्यक प्रमाणात शुल्क व दंड जमा केल्यानंतर सर्व कार्यवाही पूर्ण होऊन गुंठेवारीनुसार बांधकाम नियमित केल्याचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे, असे शहर अभियंता निकम यांनी सांगितले.