सहाय्यक पोलिस फौजदाराचा मुलगा युपीएससी परिक्षेत यशस्वी

0
11778

पिंपरी-चिंचवड पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या सहाय्यक पोलिस फौजदाराच्या मुलाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परिक्षेत यशाला गवसणी घातली आहे. त्याने या परिक्षेत ३५९ वा रँक प्राप्त केला आहे. त्याच्या या यशाने उद्योगनगरीसह त्याचे कुटूंबिय आणि पोलीस दलातील अधिकारी-कर्मचार्‍यांची मान अभिमानाने उंचावली आहे.

शुभम भगवान थिटे असे युपीएससी परिक्षा उत्तीर्ण झालेल्या श्रेणी फौजदाराच्या मुलाचे नाव आहे. थिटे कुटूंबिय मुळचे शिरूर तालुक्यातील केंदूर-पाबळ गावचे. शुभमचे वडील भगवान हे पुणे शहर पोलीस दलात कार्यरत होते. १९९३ पासून वाकड – कावेरीनगर पोलीस लाईनमध्ये थिटे कुटूंब वास्तव्यास आहेत.

२०१८ साली पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची निर्मिती झाल्यानंतर भगवान थिटे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात वर्ग झाले. सध्या ते विशेष शाखेत कार्यरत आहेत. भगवान थिटे यांच्या पत्नी वनिता या गृहिणी आहेत. पोलीस दलासारख्या क्षेत्रात कार्यरत असताना कुटूंबासाठी अतिशय कमी वेळ द्यावा लागत असल्याने अनेक कर्मचार्‍यांचे कुटूंबाकडे दुर्लक्ष होते. मात्र, भगवान थिटे यांनी आपल्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाकडे प्राधान्याने लक्ष देत त्यांना उच्चशिक्षण दिले. त्यांची मोठी मुलगी स्नेहल ही संगणक अभियंता असून हिंजवडी आयटी पार्कमध्ये इन्फोसिस कंपनीत नोकरीला आहे. तर, मुलगा शुभम याने अभियांत्रिकी अभियंता पदापर्यंत शिक्षण घेतले.

आकुर्डीतील पिंपरी-चिंचवड पॉलिटेक्निकल कॉलेजमधून अभियांत्रिकीची पदवी घेतली असली तरी शुभमचे ध्येय वेगळे होते. भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न त्याने उराशी बाळगले. त्यादृष्टीने तो गेल्या सहा वर्षापासून युपीएससी परिक्षेचा अभ्यास करीत होता. मध्ये दोन वर्षे करोना प्रादूर्भावामुळे परिक्षा झाली नाही. युपीएससीच्या चार परिक्षांमध्ये त्याला अपयश आले. मात्र, अपयशाने खचून न जाता शुभमने पाचव्यांदा युपीएससी परिक्षेची तयारी सुरू केली. रात्रं-दिवस जोमाने अभ्यास करीत त्याने परिक्षा दिली. मंगळवारी (१६ एप्रिल) युपीएससी परिक्षेचा निकाल जाहीर झाला आणि या परिक्षेत शुभमने यशाला गवसणी घातली. या परिक्षेत उत्तीर्ण होत शुभमने ३५९ वा रँक प्राप्त केला.