सहाय्यक पोलिस आयुक्तांसाठी पाच लाखाची लाच घेणारा जाळ्यात

0
209

पुणे, दि. १८ (पीसीबी) – नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात पुणे एसीबीने तीन मोठे ट्रॅप केल्यानंतर दुसऱ्या महिन्यात पुन्हा ते अॅक्टिव्ह मोडवर आले आहेत. नाशिक एसीबी युनीटप्रमाणे ते ही आता मोठे मासे गळाला लावू लागले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील देहूरोड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) मुगुटलाल पाटील यांच्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागून एक लाख घेताना ओंकार भरत जाधव या पंटरला (खासगी व्यक्ती) शनिवारी (ता.17) पकडण्यात आले. मात्र, यामुळे एसीपी पाटील यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

पाच लाखांची लाच मागून जाधव हा उद्योगनगरीतील वाकडचा रहिवासी असून देहूरोडच्या एसीपींसाठी त्याने पुणे येथील एका हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये ही लाच घेतली. एसीपी पाटील यांच्यासाठी त्याने पाच लाख रुपयांची लाच या प्रकरणातील तक्रारदाराकडे मागितली होती. त्यातील एक लाखाचा पहिला हफ्ता घेताना तो पकडला गेला. योगायोगाने त्याचे व तक्रारदाराचेही वय हे सेम (32) आहे.

एसीबीकडे तक्रार केलेल्या तरुणाविरुद्ध कात्रज-कोंढवा बायपास रोड, पुणे येथील एका जागेसंबंधात फसवणुकीचा अर्ज एसीपी पाटील यांच्याकडे आला होता. त्याची चौकशी ते करीत होते. त्यात फसवणुकीचा गुन्हा (आयपीसी 420) दाखल न करण्यासाठी जाधवने एसीपी पाटील यांच्या सूचनेवरून पाच लाखांची लाच मागितल्याची तक्रार तक्रारदाराने जाधवविरुद्ध दिली होती.
या तक्रारीच्या पडताळणीत आऱोपी जाधवने एसीपी पाटील यांच्याकरता मागितल्याचे दिसून आले. एवढेच नाही,तर एक लाख रुपयांचा पहिला हफ्ता घेताना त्याला एसीबीचे डीवायएसपी नितीन जाधव, पीआय प्रसाद लोणार, सहाय्यक फौजदार, मुकुंद अयाचित, हवालदार चंद्रकांत जाधव आणि पोलिस शिपाई दिनेश माने या पथकाने काल पकडले. त्याबद्दल त्याच्याविरुद्ध पुण्यातील कोरेगाव पोलिस स्टेशनमध्ये लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.