पुणे, दि. ६ (पीसीबी) – महाराष्ट्रातील राजकारणात अनपेक्षितपणे उलथापालथ होत असताना राज्यातील भाजप सेना युती सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या एन्ट्रीने धास्तावले आहेत. विद्यमान मंत्र्यांना आपल्याकडील खाते बदलाच्या भीतीने अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरु ठेवल्याचे चित्र प्रशासनात आहे. अनेक विभागांमध्ये बदल्यांचे पेव फुटले असून मंत्र्यांच्या दालनात संबंधित अधिकाऱ्यांची लगबग आढळून येत आहे. अपेक्षित ठिकाणी बदली व्हावी असा सर्वच अधिकाऱ्यांचा अट्टाहास असतो. सत्ताधारी कोणताही पक्ष असो बदल्यांमध्ये अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण बोलण्याचा फार महत्व असते ते अजूनही कायम आहे. सहकार मंत्र्यांकडून खाते बदलण्याच्या भीतीने कार्यतत्परता दर्शवून दोन महिन्यांमध्ये 65 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दर 5 ते 10 दिवसांच्या फरकाने काढण्यात आलेले आहेत.
सहकार विभागात बदल्यांचा धडाका सुरूच आहे त्यामुळे अधिकारी कर्मचारी वर्गात असंतोषाचे वातावरण निर्माण होत आहे. सहकार विभागाकडून गेल्या दोन महिन्यात बदल्यांचे आदेश काढले त्याचा तपशील पाहता पदस्थापनाबाबत १ आदेश व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था गट-ब या सवंर्गातून उपनिबंधक सहकारी संस्था गट-अ या संवर्गात पदोन्नती व पदस्थापनाचे दिनांक 23/05/2023 रोजी 11 आदेश काढण्यात आले. रेशीम संचालनालयाच्या आस्थापनेवरील गट-अ व गट-ब (राजपत्रित) अधिकाऱ्यांच्या सहाय्यक निबंधक सहकारी संस्था गट-ब या सवंर्गातून उपनिबंधक सहकारी संस्था गट-अ या संवर्गात तदर्थ स्वरुपात पदोन्नती व पदस्थापनाबाबत दिनांक 24/05/2023 रोजी 1 आदेश काढण्यात आला. विशेष लेखापरिक्षक वर्ग-1 सहकारी संस्था या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीचे दिनांक 26/05/2023 रोजी 11 आदेश काढण्यात आले.
उपनिबंधक सहकारी संस्था गट-अ या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीबाबतचे दिनांक 26/05/2023 रोजी 23 आदेश काढण्यात आले. असे एकूण एकाच दिवशी 34 बदल्यांचे आदेश काढण्यात आले. रेशीम विकास अधिकारी, श्रेणी-2, गट-ब (अराजपत्रित) पदावरून रेशीम विकास अधिकारी, श्रेणी-1 या पदावरील पदोन्नतीबाबत दिनांक 31/05/2023 रोजी 1 आदेश काढण्यात आला. लगेच दुसऱ्या दिवशीच दिनांक 01/06/2023 रोजी रेशीम संचालनालयाच्या आस्थापनेवरील सहायक संचालक, गट-अ या पदावरून उप संचालक, गट-अ या पदावर तात्पुरती पदोन्नतीचा १ आदेश काढण्यात आला. सहनिबंधक सहकारी संस्था गट-अ या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीबाबतचे दिनांक 16/06/2023 रोजी 8 आदेश काढण्यात आले. त्यानंतर ६ दिवसांनी पुन्हा 3 आदेश दिनांक 22/06/2023 रोजी काढले. त्यानंतर 13 दिवसांनी सहनिबंधक सहकारी संस्था गट-अ या सवंर्गातून अपर निबंधक सहकारी संस्था गट-अ या संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापनाबाबतचे दिनांक 05/07/2023 रोजी 5 बदल्यांचे आदेश काढण्यात आले.
अशाप्रकारे २ महिन्यांमध्ये 65 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आलेले आहेत. गेल्या 3 वर्षाचा विचार केला तर सन 2021 ला 94 आणि सन 2022 ला 44 बदल्यांचे आदेश काढलेले आहेत. सन 2023 ला मे, जून या दोन महिन्यातच 65 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आलेले आहेत.