परभणी, दि. १८ (पीसीबी) : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेले माजी आमदार सिताराम घनदाट आणि पाथरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेले इंजिनिअर सुरेश फड या दोघांनीही वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकला आहे.
भाजप प्रदेश कार्यालयात कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत दोघांनीही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीला चांगलाच झटका बसला आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोघांचा प्रवेश भारतीय जनता पक्षाला चांगलेच बळ मिळवून देणारा ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी आमदार सिताराम घनदाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. सिताराम घनदाट यांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. मतदारसंघात त्यांचे कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. सिताराम घनदाट हे अभ्युदय बँकेचे माजी अध्यक्षही आहेत. सहकार क्षेत्रात त्यांचे चांगले काम असल्याने त्यांची परभणी जिल्ह्यात मोठी ताकद आहे.