आळंदी, दि. २४ (पीसीबी) – आळंदी पोलिसांनी सशस्त्र दरोडा घालणारी टोळी जेरबंद केली आहे. या टोळीने आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चऱ्होली खुर्द येथे एका घरात घुसून दाम्पत्याच्या गळ्याला धारदार शस्त्रे लाऊन दरोडा घातला होता. ही घटना गुरुवारी (दि. 22) मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास घडली.
पृथ्वीराज सुखदेव चव्हाण (वय 26, रा. दापोडी केडगाव, ता. दौंड), कोहिनूर विशाल पवार (वय 21, रा. चोराची आळंदी, ता. हवेली), धीरज उत्तम चव्हाण (वय 35, रा. दापोडी, केडगाव, ता. दौंड), नरेश धनाजी सकीरा उर्फ हाकला (वय 25, रा. चोराची आळंदी, ता. हवेली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास रमेश विठ्ठल थोरवे (वय 43, रा. चऱ्होली खुर्द) आणि त्यांची पत्नी घरी झोपलेले असताना स्कोर्पिओ (एमएच 42/बीजे 5596) मधून पाचजण आले. त्यांनी थोरवे यांच्या घरावर लाथा मारून दरवाजा उघडला. त्यानंतर जबरदस्तीने घरात प्रवेश करून रमेश थोरवे, त्यांच्या पत्नी आणि वडील यांच्या गळ्याला आरोपींनी कोयता आणि विळ्याचा धाक दाखवला. घरातून 97 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम दरोडा घालून आरोपींनी चोरून नेली.
याप्रकरणी रमेश थोरवे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत या घटनेची वरिष्ठ पातळीवर दखल घेण्यात आली. आळंदी पोलिसांनी संबंधित स्कोर्पिओ गाडीचा शोध सुरु केला. अवघ्या दोन तासात पोलिसांनी पाठलाग करून स्कोर्पिओसह पाच जणांना अटक केली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.
म्हणून थोरवे यांच्या घरी टाकला दरोडा
या प्रकारात पकडलेले काही आरोपी सराईत आहेत. त्यामध्ये एक मास्टरमाईंड देखील आहे. या आरोपींना आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ठिकाणी दरोडा टाकायचा होता. तसा आरोपींनी कट देखील रचला. आरोपी त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी गेले असता तिथले लोक जागे होते. त्यातच तिथे पोलीस आले. त्यामुळे आरोपींनी तिथे दरोडा टाकण्याचा प्लॅन रद्द केला. तिथून ते घराकडे परत जात होते. मात्र जाता जाता त्यांनी चऱ्होली खुर्द येथे थोरवे यांच्या घरावर दरोडा टाकला. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपींना अटक केली.