तळवडे, दि. १२ (पीसीबी) – व्यावसायिक गाळ्यांच्या भाड्याची वसुली करण्याचे काम दिलेल्या व्यक्तीने मालकाची तब्बल सव्वा कोटी रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार एप्रिल २०१३ ते डिसेंबर २०२१ या कालावधीत सहयोगनगर तळवडे येथे घडली.संतोष यशवंत मयेकर, साईल संतोष मयेकर (दोघे रा. ताम्हाणेवस्ती, तळवडे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शरद दिगंबर काळभोर (वय ५७, रा. काळभोरनगर, चिंचवड) यांनी सोमवारी (दि. ११) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष मयेकर हा फिर्यादी यांच्याकडे सन १९९० पासून नोकर म्हणून कामाला होता. फिर्यादी काळभोर आणि भोंडवे यांच्या मालकीचे सहयोगनगर तळवडे येथे नंदादीप इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्समध्ये ३९ व्यावसायिक गाळे आहेत. त्या गाळ्यांचे भाडे वसुलीचे काम फिर्यादी यांनी संतोष मयेकर याला दिले होते. सन २०१३ ते डिसेंबर २०२१ या कालावधीत आरोपीने भाडेकरूंकडून भाडे रोख तसेच चेक स्वरूपात घेतले. ते भाड्याचे पैसे फिर्यादी अथवा त्यांच्या कुटुंबियांना न देता परस्पर स्वतःच्या आणि आरोपी साईल मयेकर याच्या बँक खात्यात जमा केली. यामध्ये फिर्यादी यांची एक कोटी २० लाख २८ हजार २५० रुपयांची फसवणूक झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.