सवाई गंधर्वप्रमाणे नृत्य गुरु रोहिणी भाटे नृत्य महोत्सव पुण्याचे वैभव ठरेल, ना. चंद्रकांतदादा पाटील यांचा विश्वास

0
144

पुणे, दि. २९ (पीसीबी) – कोथरुडमधील नृत्यप्रेमींना आणि शास्त्रीय नृत्यकलाकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून नृत्यगुरु रोहिणी भाटे नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात देशभरातून आलेल्या विविध नृत्यांगनांनी आपली कला सादर करत कोथरुडकरांची मने जिंकली. सवाई गंधर्वप्रमाणे नृत्यगुरु रोहिणी भाटे नृत्य महोत्सव पुण्याच्या वैभवात भर घालेल असा विश्वास नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

पुणे ही राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून संपूर्ण देशात ओळखली जाते. त्यातच कोथरुड हे या सांस्कृतिक राजधानीचं माहेरघर म्हणून सर्वांना परिचित आहे. अनेक कलावंत आपल्या समृद्ध कलाविष्काराने आणि प्रतिभेने संपूर्ण महाराष्ट्रावर अधिराज्य गाजवलं आहे. अशा या उपनगरात नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्याची सदैव नेहमीच इच्छा असते. त्यासाठी गतवर्षी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त नृत्यवंदना हा शास्त्रीय नृत्यावर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यास कोथरुडकरांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.

या महोत्सवाचा प्रतिसाद पाहून दरवर्षी शास्त्रीय नृत्य कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी दरवर्षी नृत्यमहोत्सव आयोजित करण्याचे नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर केले होते, त्यानुसार पुणे शहराचे भूषण असलेल्या, कथक नृत्य गुरू पंडिता रोहिणी भाटे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कोथरुडमधील शुभारंभ लॉन्स येथे नृत्य महोत्सव आयोजित करण्यात आले होते.

यावेळी देशभरातील अनेक कलाकारांनी आपापले कलाविष्कार सादर करत कोथरुडकरांची मनं जिंकली. यामध्ये प्रामुख्याने जगविख्यात कलाकारांमध्ये गुरू श्रीमती. रमा वैद्यनाथन आणि ग्रुप (भरतनाट्यम), गुरू श्रीमती. वास्वती मिश्रा(कथक) आणि ग्रुप आणि गुरू श्रीमती प्रीती पटेल आणि ग्रुप (मणिपुरी) या नृत्यप्रस्तुती सादर करुन कलारसिक कोथरुडकरांना मंत्रमुग्ध केले.

नामदार चंद्रकांतदादा पाटील यावेळी म्हणाले की, “कोथरुड ही पुण्याच्या सांस्कृतिक राजधानीचे माहेर घर आहे. त्यामुळे इथे कलाकारांना नेहमीच लोकाश्रय मिळतो. पुण्यात सवाई गंधर्व महोत्सव हा शास्त्रीय संगीत आणि गायक यांच्यासह शास्त्रीय संगीतावर प्रेम करणाऱ्यांसाठी आनंदाची पर्वणीच असते. शास्त्रीय नृत्य हा देखील आपला भारतीय संस्कृतीचं वैभव वाढविणारा कलाप्रकार आहे. त्यामुळे सवाई गंधर्वप्रमाणेच नृत्य गुरु रोहिणी भाटे यांच्या नावे सुरु केलेला हा कार्यक्रम आगामी काळात पुण्याच्या कलावैभवात भर घालेल,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे संयोजक पुनीत जोशी, शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था आणि युवा सुराज्य प्रतिष्ठानच्या यांनी केले होते.