सर्व हॉस्पिटलमधील वैद्यकीय कचऱ्याची नियमानुसार विल्हेवाट लावा

0
481

– माजी उपमहापौर तुषार हिंगे यांचे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे मागणी

पिंपरी,दि. ६ (पीसीबी) – शासकीय, तसेच खाजगी हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात घातक स्वरूपाचा वैद्यकीय कचरा निर्माण होत असून त्यांची शासन नियमावली नुसार सदर हॉस्पिटल्स यांच्यामार्फत विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. परंतु सद्यपरिस्थिती पाहता हा कचरा हॉस्पिटलचे आवारात कोणत्याही प्रक्रियेविना पडून असतो. नियमबाह्यप्रकार थांबवून नागरिकांच्या आरोग्यासाठी वैद्यकीय कच-याची नियमानुसार योग्य पध्दतीने विल्हेवाट लावावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी उपमहापौर तुषार हिंगे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे.

या संदर्भात तुषार हिंगे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी यांना सविस्तर निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट यांचे कामकाजाचे अवलोकन केले असता आणि सद्यपरिस्थिती पाहता कोविडचा धोका खूप कमी झाला आहे. तरी पूर्ण संपलेला नाही. सर्व हॉस्पिटल्स कोविड -१९ ची काळजी घेण्यासाठी पीपीई किट्स, मास्क्स व इतर आवश्यक साहित्य मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. हे सर्व लक्षात घेता प्रत्येक हॉस्पिटल मध्ये खूप मोठ्या प्रमाणात घातक स्वरूपाचा वैद्यकीय कचरा निर्माण होतो. त्यांची शासन नियमावली नुसार सदर हॉस्पिटल्स यांचेमार्फत विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने संसर्गजन्य वैद्यकीय कचऱ्याच्या धोक्याबद्दल जागतिक स्तरावर जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला आहे. चुकीच्या पद्धतीने वैद्यकीय कचरा हाताळणे अथवा काहीच प्रक्रिया न करता इस्पितळाबाहेर पाठवणे अत्यंत धोकादायक आहे. वैद्यकीय कचरा इस्पितळाबाहेर पाठवण्यापूर्वी त्यावर निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया होणे आवश्यक आहे. मायक्रोवेव्ह आधारित प्रणालीचे पेटंट भारत सरकार आणि “समीर” या संस्थेच्या नावावर संयुक्तपणे आहे. डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड आयटीने मायक्रोवेव्ह आधारित निर्जंतुकीकरण करणारी मशिन्स सर्व इस्पितळांमध्ये वापरण्यासाठी शिफारस केली आहे. योग्य आदेश धोरण ठरवण्याचे निर्देश दिले आहेत.

पर्यावरण मंत्रालयाने पत्रके जारी करून पर्यावरण संरक्षण कायदा काटेकोरपणे व गांभीर्याने राबवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्या नुसार राज्यस्तरावर राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला सर्व जबादारी व बीएमडब्लू नियमांच्या अंमलबजावणीचे अधिकार दिले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पत्रकानुसार मायक्रोवेव्ह आधारित निर्जंतुकीकरण्याची प्रणाली ऑटोक्लेव्ह प्रणालीच्या तुलनेत अधिक उपयुक्त आहे. असे असून सुद्धा इस्पितळांमध्ये मायक्रोवेव्ह आधारित मशिन्सचा उपयोग केला जात नाही. कायद्यातील तरतुदीनुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मायक्रोवेव्ह आधारित मशिन्स वापरण्यासाठी योग्य ती कारवाई करण्यात यावी, असे तुषार हिंगे यांनी नमूद केले आहे.