सर्व वज्रमूठ सभा रद्द

0
270

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पवारांच्या या निर्णयाचा परिणाम आता मविआच्या वज्रमूठ सभेवर होताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर नाशीक आणि पुणे येथे होणारी वज्रमूठ सभा रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, वज्रमूठ सभा रद्द कऱण्याचा निर्णय म्हणजे महाआघाडीचे विसर्जन होण्याच्या दिशेने पडलेले पहिले पाऊल असल्याची चर्चा सुरू आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राजकीय निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर अनेक नेत्यांनी राजीनामादेखील दिला आहे. अशातच राज्यातील होणाऱ्या तीनही सभा रद्द होणार आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, कोल्हापूर नाशीक आणि पुणे येथे होणारी वज्रमूठ सभा रद्द होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, यासंदर्भात जयंत पाटील यांनी माहिती दिली. उन्हामुळे सभेच्या तारखा बदलण्यात आल्या आहे. सभा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यासंदर्भात ही चर्चा १ तारखेलाच झाली होती. असे पाटील म्हणाले.
मात्र, आत्तापर्यंत झालेल्या या सभा सायंकाळी पार पडल्या आहेत. मग पाटील यांनी सभा रद्द होण्याचे कारण कितपत खरं? असा सवाल उपस्थित होत आहे.

भाजपचे नेते निलेश राणे यांनी मुंबई येथील वज्रमूठ सभेनंतर माध्यमांशी बोलताना महाआघाडीचीही शेवटचीच सभा असल्याचे विधान केले होते, ते आता तंतोतंत खरे ठरले आहे.