सर्व महापालिका आयुक्तांची चौकशी करा – इक्बाल चहल

0
324

मुंबई, दि. १६ (पीसीबी)- मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल हे ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. कोरोना काळातील निर्णयाप्रकरणी चहल यांची चौकशी करण्यात येणार आहे. ईडीने चहल यांना समन्स बजावलं होतं. त्यामुळे चहल आज ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. ईडीच्या कार्यालयात दाखल होण्यापूर्वी चहल यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील सर्वच महापालिका आयुक्तांची ईडीने चौकशी करावी, अशी मागणी इक्बाल चहल यांनी केली आहे. चहल यांच्या या मागणीमुळे राज्य सरकारची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे. तर चहल यांची किती तास चौकशी चालणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आज सकाळी साडे अकराच्या दरम्यान इक्बाल सिंह चहल ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. त्यांच्या हातात काही फायली होत्या. या फायलीमध्ये कोरोना काळातील निर्णय आणि कामे यांची माहिती असल्याचं सांगितलं जात आहे. चहल यांची थोड्याच वेळात चौकशी सुरू होईल. ही चौकशी किती काळ सुरू राहील याबाबतची काहीही माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान, मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी ईडी चौकशीला सामोरे जाण्याआधी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. काही अतिरिक्त आयुक्त मुंबई पालिका इक्बालसिंह चहल यांच्या शासकीय निवासस्थानी दाखल झाले होते. कोरोना काळातील कामे आणि घेतलेले निर्णय याबाबत चहल यांची चौकशी होणार आहे. त्यामुळे याच कामांचा आढावा घेण्यासाठी आणि ईडीला उत्तर देण्यासाठी हा आढावा घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, चहल यांना ईडीने नोटीस बजावली होती. त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. 140 दिवसांपूर्वी आझाद मैदान पोलीस ठाण्यात जम्बो कोविड सेंटर घोटाळ्या प्रकरणी सुजित पाटकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या संदर्भातील सर्व कागदपत्रे ही मुंबई पोलिसांनी जप्त केली पाहिजेत. तशा प्रकारची मी विनंती आता केली आहे, असं किरीट सोमय्या म्हणाले.

मुंबई महानगरपालिका आणि प्रशासक इकबाल सिंह चहल यासंदर्भात सहकार्य करत नाहीयेत असं माझं म्हणणं आहे. सुजित पाटकर हे संजय राऊत यांचे पार्टनर असून जम्बो कोविड सेंटर घोटाळा हा साधारण शंभर कोटींचा आहे. पण मला विश्वास आहे की यावर नक्की कारवाई होईल, असं सोमय्या म्हणाले.

तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोरोना काळात परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात आले. त्यावेळी महापालिका प्रशासनाला जे योग्य वाटलं ते निर्णय घेतले. ठाकरे सरकारनेही महत्त्वाचे निर्णय घेतले. त्याकाळात तातडीने निर्णय घेतले नसते तर उत्तर प्रदेशच्या गंगेप्रमाणे मुंबईतील मिठी नदीतही प्रेते तरंगताना दिसली असती, असं राऊत म्हणाले.