सर्व जातीय मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन; वधू-वरांसाठी केळवण कार्यक्रम उत्साहात

0
400

भोसरी, दि. २१ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहर तेली समाज आयोजित सर्व जातीय सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या एकूण आठ वधू-वर जोडप्यांचा केळवणाचा कार्यक्रम संस्थेच्या वतीने नुकताच भोसरीत आयोजित केला होता. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात, उत्साहात व आनंदात हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी ७ मे २०२३ रोजीच्या नियोजित मोफत सर्व जातीय सामुदायिक विवाह सोहळ्याच्या नियोजनाबाबत संस्थेचे अध्यक्ष श्री. शिवराज लक्ष्मण शेलार , मुख्य सचिव श्री. कैलास किसन शेजवळ व कार्यकारी सदस्य श्री. नितीन पांडुरंग जगनाडे यांनी उपस्थित सर्व वधु-वर व त्यांच्या नातेवाईकांना महत्त्वाच्या सूचना व मार्गदर्शन केले.

केळवण कार्यक्रम प्रसंगी उपस्थित सर्व वधु- वर व त्यांच्या नातेवाईकांचा संस्थेच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. सर्व उपस्थितांसाठी संस्थेच्या वतीने सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे नियोजन केल्याबद्दल उपस्थित सर्व वधु- वर व त्यांच्या नातेवाईकांनी संस्थेला , सर्व पदाधिकाऱ्यांना व समाजाला धन्यवाद दिले. शेवटी सर्व वधू वर व त्यांच्या नातेवाईकांना शुभविवाह स्थळी जाऊन विवाह नियोजनाची माहिती दिली.

लग्न जमलेल्या इच्छुक वधू- वर जोडप्यांनी व त्यांच्या पालकांनी मोफत सर्व जातीय सामुदायिक विवाह सोहळ्यात नाव नोंदणीसाठी ‘राजगड’, सर्व्हे नंबर २११, विवेकानंद कॉलनी, आळंदी रोड,उमेद स्वीट कॉर्नर जवळ, भोसरी ,पुणे- ३९ येथील संपर्क कार्यालयात दिनांक २५/०४/२०२३ पर्यंत संपर्क करण्याचे संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.