पिंपरी, दि. १० (पीसीबी) : शहरातील नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी, तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी महापालिकेच्या सर्व आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उद्या(सोमवारी) सकाळी १० ते १२ या वेळेत जनसंवाद सभा होणार आहे.
नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणा-या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय दर सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्याचा निर्णय प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी घेतला. या सभेकरीता महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय मुख्य समन्वय अधिका-यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये, अ क्षेत्रिय कार्यालय – सह शहर अभियंता श्रीकांत सवणे (बी.आर.टी.एस), ब क्षेत्रिय कार्यालय – शहर अभियंता मकरंद निकम, क क्षेत्रिय कार्यालय – भूमी आणि जिंदगी सहायक आयुक्त प्रशांत जोशी, ड क्षेत्रिय कार्यालय – समाज विकास विभाग उपआयुक्त अजय चारठाणकर, इ क्षेत्रिय कार्यालय – सह शहर अभियंता सतीश इंगळे, फ क्षेत्रिय कार्यालय – प्र.अतिरिक्त आयुक्त (३) उल्हास जगताप, ग क्षेत्रिय कार्यालय – उप आयुक्त तथा प्रभारी कायदा सल्लागार चंद्रकांत इंदलकर, ह क्षेत्रिय कार्यालय – पर्यावरण विभाग सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय ते या जनसंवाद सभेचे अध्यक्षस्थान भुषवत आहेत.
संबंधित क्षेत्रीय अधिकारी व सर्व विभागांचे विभागस्तरावरील अधिकारी या सभेस उपस्थित राहतात. मुख्य समन्वय अधिकारी हे जनसंवाद सभेसाठी आलेल्या प्रत्येक नागरिकांची तक्रार नोंदवून घेऊन शक्य असल्यास तिथेच संबंधित अधिका-यांशी चर्चा करून तक्रारींचे निराकरण करतात.