सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि ट्रम्प यांची नवी टॅरिफ घोषणा; जागतिक व्यापारात खळबळ

0
1

दि.२२(पीसीबी)- अमेरिकेच्या व्यापार धोरणाबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने लादलेले काही जागतिक टॅरिफ बेकायदेशीर ठरवून रद्द केल्याची माहिती समोर आल्यानंतर लगेचच ट्रम्प यांनी नव्या करदराची घोषणा केल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाली आहे.

माहितीनुसार, न्यायालयाने १९७७ च्या आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक अधिकार कायद्याचा वापर करून मोठ्या प्रमाणात शुल्क लादणे अधिकारांच्या मर्यादेबाहेर असल्याचे निरीक्षण नोंदवले. या निर्णयामुळे संबंधित देशांवरील करदर सुमारे १० टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत जागतिक करदर १५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केल्याचे वृत्त आहे. अमेरिकन हितांचे संरक्षण करण्यासाठी आणि अमेरिकेचा फायदा घेणाऱ्या देशांच्या अन्याय्य व्यापार पद्धतींना उत्तर देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केल्याचे सांगितले जाते. तसेच आगामी काही महिन्यांत कायदेशीरदृष्ट्या वैध अशा नव्या टॅरिफ धोरणांची अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी सूचित केले आहे.

या घडामोडींचा भारतासह जगभरातील व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेसोबत मोठ्या प्रमाणात व्यापार करणाऱ्या देशांच्या निर्यातीवर दबाव येऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, जर शुल्कवाढ प्रत्यक्षात लागू झाली तर इतर देशही प्रत्युत्तरादाखल अमेरिकेवर कर लादू शकतात, ज्यामुळे जागतिक व्यापार तणाव वाढण्याची शक्यता आहे.दरम्यान, या प्रकरणातील अधिकृत तपशील आणि अंतिम धोरण स्पष्ट होण्याकडे जागतिक बाजारपेठा आणि आर्थिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.