नवी दिल्ली, दि. २९ (पीसीबी) – बहुमत चाचणीच्या सुनावणीत काय झाला युक्तीवाद? शिवसेनेचे वकील सिंघवी म्हणाले की, आम्हाला सात ते आठ मुद्दे मांडायचे आहेत. ही बहुमत चाचणीसाठी खूप कमी वेळ देण्यात आला आहे. चाचणीसाठी सर्व आमदार हजर हवेत तरंच ती खरी ठरेल. एवढ्या वेगानं बहुमत चाचणीची मागणी का? असा युक्तीवाद शिवसेनेच्या वकिलांनी केला आहे.
मतदानासाठी कोण पात्र कोण अपात्र हे आधी ठरवायला हवं. अपात्रतेबाबत निर्णय नसताना बहुमत चाचणीसाठी एवढी घाई का? दोन बहुमत चाचणीसाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी हवा असा युक्तीवाद सिंघवी यांनी केला. दरम्यान अपात्रतेचा निर्णय आणि बहुमत चाचणीचा काय संबंध असा सवाल कोर्टाने शिवसेनेच्या वकिलांना केला आहे.
आधी अपात्रतेचा निर्णय व्हावा आणि त्यानंतर बहुमत चाचणीसाठी मागणी करण्यात यावी नाहीतर सध्या बंड केलेले आमदार मतदान करण्यासाठी पात्र ठरतील. ११ तारखेच्या कोर्टाच्या आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयानंतर बहुमत चाचणी करण्यात यावी असा युक्तीवाद सिंघवी यांनी केला आहे.
सिंघवी यांनी केलेल्या युक्तीवादावर उत्तर देताना, आमदारांच्या अपात्रतेवर अध्यक्षांनी कारवाई सुरू केली होती पण त्याच्यानंतर कुणीतरी आक्षेप घेतला असं कोर्टाने सांगितलं आहे.
विधानसभेच्या उपाध्यक्षांच्या विरोधात अविश्वाचा ठराव दाखल करण्यात आला होता त्यामुळे आमदारांना वेळ वाढवून दिला होता असं कोर्टाने सांगितलं आहे. सिंघवी यांनी युक्तीवाद करताना राजेंद्र सिंह राणा यांच्या केसचा दाखला दिला आहे.
उद्या या आमदारांना मतदान करू देणं हे संविधानाच्या विरोधात आहे. राज्यपालांकडून खूप घाईने हा निर्णय घेण्यात आला, विरोधी पक्षनेत्याच्या सल्ल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणं गरजेचं आहे असा युक्तीवाद शिवसेनेच्या वकिलांकडून करण्यात आला आहे.