सर्वेक्षणात आढळणाऱ्या मालमत्तांच्या सुनावणीसाठी यंत्रणा सज्ज

0
108

सात ठिकाणी सुनावणी केंद्र निश्चित
ऑफलाईन आणि ऑनलाईन सुविधा उपलब्ध

पिंपरी-चिंचवड 17 जुलै (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील नवीन, वाढीव अशा मालमत्तांचे अत्याधुनिक ड्रोनच्या सहाय्याने सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात आढळलेल्या मालमत्ता धारकांना विशेष नोटीसही तत्काळ देण्यात येत आहे. ज्या मालमत्ता धारकांचे कर आकारणीबाबत हरकत, आक्षेप असतील, अशा मालमत्ता धारकांच्या सुनावणीसाठी शहरातील विविध भागात सात ठिकाणी सर्व सुविधांयुक्त केंद्र निश्चित केली आहेत. ऑफलाईनसह ऑनलाईनचीही यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात सध्यस्थितीत 6 लाख 30 हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. मात्र त्यानंतरही शहर परिसरात नोंदणी नसलेल्या सुमारे दोन लाख नवीन आणि वाढीव बांधकाम असलेल्या मालमत्ता आढळण्याचा महापालिका प्रशासनाचा अंदाज आहे. त्यामुळेच आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी नवीन, वाढीव अशा मालमत्तांचा अत्याधुनिक ड्रोनच्या सहाय्याने सर्वेक्षण करण्याचा महापालिकेच्या इतिहासात प्रथमच ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यानुसार मालमत्ता सर्वेक्षणासाठी महापालिकेने स्थापत्य कन्सल्टंट प्रा. लि. कंपनीची नियुक्ती केली असून सर्वेक्षणास प्रारंभ झाला आहे.

सर्वेक्षणात आढळलेल्या नवीन मालमत्ता धारकांना कर आकारणीबाबत पहिली विशेष नोटीस बजाविण्यात येत आहे. या नोटीसबाबत मालमत्ता धारकांची काही हरकत, आक्षेप असल्यास संबंधित झोन कार्यालयात लेखी तक्रार दाखल करता येईल. यासाठी महापालिकेने सात ठिकाणी सुनावणी केंद्र निश्चित केले आहेत. सुनावणीसाठी आक्षेप असलेल्या आपल्या मिळकतीची सर्व कागदपत्रे मालमत्ता धारकांनी आणल्यानंतर तत्काळ सुनावणी घेण्यात येणार आहे.
चौकट

ऑनलाईन सुनावणीचीही सुविधा उपलब्ध
मालमत्ता धारकांसाठी सात ठिकाणी सुनावणी केंद्र निश्चित केली आहे. मात्र, अनेक मालमत्ता धारकांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी हजर राहणे शक्य होणार नाही. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेच्या वतीने ऑनलाईन सुनावणीचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी स्कॅन कोडही दिला आहे. या कोडवर स्कॅन केल्यास संबंधितांना त्वरित सुनावणीची तारीखही दिली जाते.

24 हजार मालमत्ता धारकांना बजावली विशेष नोटीस
सर्वेक्षणात आढळलेल्या 24 हजार नवीन आणि वाढीव मालमत्ता धारकांना महापालिकेच्या वतीने प्रथम विशेष नोटीस बजावली आहे. या आठवड्यात 30 हजार तर 31 जुलैपर्यंत 75 हजार जणांना प्रथम विशेष नोटीस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

ही आहेत सुनावणीची सात ठिकाणे
1) वाकड, थेरगाव, किवळे, कस्पटे वस्ती- वाकड विभागीय कार्यालय (नवीन कार्यालय इमारत), तेजस इंपेरीया, वाकड पोलीस चौकी शेजारी, भुजबळ चौक, वाकड.
2) आकुर्डी, निगडी, चिंचवड- आकुर्डी विभागीय कार्यालय-पांडुरंग काळभोर सभागृह, पांढारकर नगर, आकुर्डीगाव‌.
3) सांगवी, मनपा भवन, फुगेवाडी-
दापोडी- फुगेवाडी-दापोडी विभागीय कार्यालय मनपा दवाखाना इमारत, पहिला मजला, रेल्वे गेट जवळ, कासारवाडी.
4) तळवडे, चिखली- तळवडे विभागीय कार्यालय-श्री. स्वामी समर्थ सांस्कृतिक भवन, सेक्टर नं. 21, शिवभूमी विद्यालयाजवळ, यमुनानगर, निगडी.
5) मोशी, भोसरी-मोशी विभागीय कार्यालय (नवीन कार्यालय इमारत) सन हार्मोनी, तळमजला गाळा क्र. 1 ते 4, शिवाजीवाडी, मोशी.
6) दिघी, च-होली- दिघी विभागीय कार्यालय लोटस पॅराडाईज, पहिला मजला, दत्तनगर, दिघी.
7) पिंपरी वाघेरे, पिंपरी नगर- जुने दुय्यम निबंधक कार्यालय इमारत कै. नंदकुमार जाधव उद्यान समोर, अशोक चित्रमंदिर जवळ, पिंपरी.