सर्वाधिक टॅक्स आम्ही भरायचा, सगळे प्रकल्प मात्र भोसरीला

0
116

पिंपरी, दि. ९ ऑगस्ट (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडे आम्ही सर्वाधिक टॅक्स भरत असताना, सर्व प्रकल्प मात्र भोसरी विधानसभा मतदार संघात राबवले जात आहेत. आम्ही केवळ खड्डेच पहायचे का? असा संतत्प सवाल पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष दत्तात्रय देशमुख यांनी उपस्थित केला आहे. स्मार्ट सिटी असूनही पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, वाकड, रहाटणी, ताथवडे, पुनावळे या भागातील सर्व रस्ते पावसाळ्यात उखडलेले असल्याने आता हाऊसिंग सोसायटीच्या नागरिकांनी प्रशासनाला जाब विचारला आहे. पोलीस आयुक्तालय, न्यायालय, इंजिनिअरिंग कॉलेज, बाजार समिती, आरटीओ सह सर्वच शासकीय कार्यालये भोसरी मतदारसंघाकडे गेल्याने चिंचवडचे आमदार काय करतात, असा सवाल फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये गुरूवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीमध्ये आमदार महेश लांडगे प्रतिनिधीत्व करीत असलेल्या भोसरी विधानसभा मतदार संघातील विविध विकासकामांवर सकारात्मक चर्चा झाली. तुलनेत चिंचवड विधानसभेच्या एकाही प्रकल्पाबाबत देवेंद्र फडणवीस किंवा मुख्यमंत्र्यांकडे बैठक, चर्चा झालेली नाही म्हणून या भागातील जनतेते नाराजीचा सूर आहे.

विशेष म्हणजे, केंद्र सरकारच्या प्रतिथयश शैक्षणिक संस्थांपैकी एक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) शाखा शहरात उभारण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय झाला. एकूण ७० एकर जागेत ही संस्था सुरू होणार असल्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराची ओळख जागतिक पातळीवर शैक्षणिक क्षेत्रात निर्माण होणार आहे. याबाबत सर्वच प्रसारमाध्यमे वृत्तांकन झाले आणि सोशल मीडियावर ‘पोस्ट’ व्हायरल होवू लागल्या आहेत.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड विकास महासंघाच्या ‘व्हॉट्सॲप ग्रुप’वर अध्यक्ष दत्तात्रय देशमुख यांनी अत्यंत मार्मिक टिपण्णी केली आहे. ‘‘नक्कीच छान बातमी आहे, मनापासून अभिनंदन. परंतु, एक शहरात फार दुजाभाव होत आहे, असे नेहमी वाटते. सर्वात जास्त टॅक्स भरायचा चिंचवडकरांनी आणि मोठे रोड, कमिशनर ऑफीस, मोठे गार्डन, आत्ता कॉलेज कुठे, तर भोसरीकडे आणि चिंचवडकर कुठे खड्डयात..!’’ अशी निराशा व्यक्त करणारी प्रतिक्रिया त्यांनी आपल्या पोस्टमध्ये दिली आहे.