तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यासाठी प्रक्रिया सुरु आहे. या लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात ६० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले होते. निवडणूक लढवणारे उमेदवार आपल्या उमेदवारी अर्जासोबत संपत्ती आणि गुन्हे दाखल असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र दाखल करत आहेत. त्यातून उमेदवारांच्या संपत्तीचे आकडे समोर येत आहेत. कोणाकडे किती संपत्ती आहे, हे सर्वसामान्य लोकांना कळत आहे. आतापर्यंत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जात देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? त्याचे नाव समोर आले आहे. त्यांच्या संपत्तीचे हे आकडे पाहिल्यावर डोळे विस्फारले जाणार आहेत. त्यांनी 5,785.28 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. ते व्यवसायाने डॉक्टर आहेत. पेम्मासानी चंद्रशेखर असे त्यांचे नाव आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर लोकसभा मतदार संघातून तेलुगू देसम पक्षाकडून ते निवडणूक लढवत आहेत.
डॉक्टरांची अशी आहे संपत्ती
एनआरआय उमेदवार असलेले डॉ. पेम्मासानी चंद्रशेखर यांची बहुतांश संपत्ती अमेरिकेत आहे. त्यांनी 2022-23 या आर्थिक वर्षात भारतातील उत्पन्न 3 लाख 68 हजार 840 रुपये इतके दाखवले होते. तर त्यांची पत्नी कोनेरू श्रीरत्न यांचे 1 लाख 47 हजार 680 रुपये इतके उत्पन्न होते. त्यांच्याकडे मुदत ठेवी आणि इतर गुंतवणुकीसह 2,316 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. तर चंद्रशेखर यांच्या पत्नी कोनेरू श्रीरत्न यांच्याकडे 2,289 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे.
तसेच चंद्रशेखर यांची स्थावर मालमत्ता 72 कोटी 24 हजार 245 रुपये आहे तर श्रीरत्न यांची 34 कोटी 82 लाख 22 हजार 507 रुपये संपत्ती आहे. त्या दोघांवर 519 कोटींचे कर्ज आहे. जगभरात विविध प्रकारच्या 101 कंपन्यांचे शेअर्स त्यांनी घेतले आहेत.