सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करणारा अर्थसंकल्प – अजित गव्हाणे

0
329

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.9) मांडलेला अर्थसंकल्प हा जनतेची निव्वळ दिशाभूल करणारा, घोषणांचा पाऊस पाडणारा आणि पिंपरी-चिंचवडकरांच्या पदरी निराशा निर्माण करणारा आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे.

शिंदे -फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. 9) विधानभवना सादर केला. या अर्थसंकल्पावर प्रतिक्रीया देताना अजित गव्हाणे म्हणाले, केवळ आकड्यांचा खेळ करून हा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. जनतेची अक्षरश: दिशाभूल करण्यात आली असून महाराष्ट्रासाठी कोणताही भरीव कार्यक्रम या अर्थसंकल्पामध्ये दिसून येत नाही. जनतेच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पाद्वारे करण्यात आला आहे.

सर्वसामान्य नागरीक, उद्योजक, कामगार यांच्यासाठी कोणतीही तरतूद अर्थसंकल्पामध्ये दिसून येत नाही. सर्वसामान्य कष्टकरी, उपेक्षित वर्ग अथवा महिलांसाठी कोणतीही भरीव तरतूद करण्यात आलेली नाही. पिंपरी-चिंचवड शहरातील उद्योजक, कामगार, गोर-गरीब वर्गासाठी अथवा औद्योगिक नगरी म्हणून शहरवासियांच्या पदरी काहीच पडलेले नाही. त्यामुळे निव्वळ घोषणांचा पाऊस पाडणारा आणि सर्वसामान्यांच्या पदरी निराशा निर्माण करणाराच हा अर्थसंकल्प असल्याचेही गव्हाणे यांनी म्हटले आहे.