पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना गुन्हे शाखा युनिट दोनची कारवाई
पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – सराईत गुन्हेगार दाद्या गवळी आणि त्याचे साथीदार ट्रान्सपोर्टनगर येथील एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या आरोपींकडून घातक शस्त्रे आणि दरोड्याचे साहित्य जप्त केले.
आनंद उर्फ दाद्या राजू गवळी (वय २०, रा. आझाद चौक, निगडी), दीपक अरुण चांदणे (वय २२, रा. ओटास्किम, निगडी), सागर रामदास जाधव (वय २१, रा. ओटास्किम, निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस नाईक नामदेव कापसे आणि पोलीस कॉन्स्टेबल अजित सानप यांना पेट्रोलिंग करत असताना माहिती मिळाली की, दाद्या गवळी टोळीचा म्होरक्या, रेकॉर्डवरील तडीपार गुन्हेगार आनंद उर्फ दाद्या गवळी, तडीपार गुन्हेगार जाकीर पठाण, तडीपार गुन्हेगार सागर जाधव आणि इतर साथीदार ट्रान्सपोर्ट नगर येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकणार आहेत. त्यापूर्वी ते भीमाईनगर ओटास्कीम निगडी येथे एकत्र जमले असून शस्त्र व साहित्याची जुळवाजुळव करत आहेत.
त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून आनंद गवळी, दीपक चांदणे, सागर जाधव आणि दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी एक तलवार, दोन कोयते, एक रॉड, मिरची पूड, दोरी, मोबाईल फोन, रोख रक्कम असे साहित्य जप्त केले. पोलिसांनी अटक केलेले आरोपी सराईत आणि तडीपार गुन्हेगार आहेत. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.