सराईत गुन्हेगार अस्लम मुजावर स्थानबद्ध

0
79

चिखली, दि.२० जुलै (पिसीबी) – चिखली येथील सराईत गुन्हेगार अस्लम बशीर मुजावर (वय 29, रा. चिखली) याला एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करत येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्याच्या विरुद्ध 2013 ते 2024 पर्यंत 12 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गरीब, कष्टकरी, नोकरदार, व्यापारी वर्गाचा समावेश आहे. लोकवस्ती असलेल्या परिसरात सराईत गुन्हेगार अस्लम बशीर मुजावर राहण्यास होता. तो त्याच्या साथीदारांसह जवळ तलवार, लाकडी दांडके, हॉकी स्टिक, यासारखे घातक शस्त्रे बाळगून रात्री-अपरात्री मोरेवस्ती, चिखली, कुदळवाडी, निगडी, परीसरात नागरिकांमध्ये दहशत निर्माण होईल असे वर्तन करत होता.

गर्दी करून मारामारी, गंभीर दुखापत करणे, खंडणी मागणे, मालमत्तेचे नुकसान करणे असे गुन्हे वारंवार करत होता. त्याने आपल्या साथीदारांसह परीसरात दहशत निर्माण केली होती. तसेच त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सामान्य लोकांच्या जिवीतास व मालमत्तेस धोका निर्माण झाला होता. याला आळा घालण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगार अस्लम बशीर मुजावर याला स्थानबध्द करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले.