सराइत वाहन चोरट्याला अटक, १३ दुचाकी जप्त

0
311

भोसरी, दि. ३० (पीसीबी) – सराइत वाहन चोरट्याला अटक करत पोलिसांनी चोराकडून सहा लाख रुपये किमतीच्या १३ दुचाकी जप्त केल्या. त्याच्याकडील एका चावीचा वापर करून आरोपी दुचाकी चोरी करीत होता. तसेच चोरीच्या दुचाकी गायरान भागात झाडाझुडपात लपवून ठेवत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. भोसरी पोलिसांनी ही कारवाई केली.

रामेश्वर नवनाथ अडकिने असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील सहायक निरीक्षक कल्याण घाडगे आणि उपनिरीक्षक मुकेश मोहारे यांनी वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी तपास सुरू केला. दोन पथके तयार करून चोरट्यांचा शोध घेण्यात आला. वाहनचोरी करणारा एक जण भोसरी येथील स्मशानभूमीजवळ वाहन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून कारवाई केली. यात रामेश्वर अडकिने याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता दुचाकी चोरीच्या आठ गुन्ह्यांची उकल झाली. त्याच्याकडून सहा लाख रुपये किमतीच्या १३ दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या.

रामेश्वर अडकिने याने भोसरी, भोसरी एमआयडीसी, दिघी, चिखली, महाळुंगे, चाकण पोलीस ठाण्याच्या हददीत व पिंपरी तसेच चिंचवड परिसरातील दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. रामेश्वर अडकिने हा त्याचा साथीदार परशुराम कांबळे (रा. भोसरी) याच्यासोबत मिळून चोरी करीत होता.

ही कामगिरी सहायक पोलीस आयुक्त प्ररणा कट्टे, भोसरीचे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भास्कर जाधव, निरीक्षक (गुन्हे) अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक कल्याण घाडगे, उपनिरीक्षक मुकेश मोहारे, सहायक फौजदार राकेश बोयणे, पोलीस कर्मचारी हेमंत खरात, अजय डगळे, रवींद्र जाधव, नवनाथ पोरे, धोंडीराम केंद्रे, प्रभाकर खाडे, सागर जाधव, आशिष गोपी, संतोष महाडीक, सचिन सातपुते, तुषार वराडे, स्वामी नरवडे, भाग्यश्री जगदाडे यांनी केली.