सरसंघचालक मोहन भागवतांना पंतप्रधान मोदीं इतकी सुरक्षा

0
104

नागपूर, दि. २८ (पीसीबी) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मोहन भागवत यांना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या इतकीच सुरक्षा पुरवण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतलाय. त्यांची अचानक सुरक्षा का वाढवण्यात आली? याबद्दल सवाल उपस्थित केले जात आहे. शरद पवार यांना काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडून झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. त्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. भागवतांना पंतप्रधान मोदीं इतकी सुरक्षा देण्यात आली आहे. मात्र अचानक सुरक्षेत वाढ करण्यात आल्याने त्यांना कुठला धोका आहे अशी भीती व्यक्त केली जात आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मोहन भागवतांना आधी झेड प्लस सुरक्षा होती, त्यात वाढ करून एडवान्स सिक्युरिटी लाइजन पर्यंत करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनाही इतकीच सुरक्षा दिली जात आहे.

मोहन भागवतांना कोणाची भीती?
भागवतांची सुरक्षा का वाढविण्यात आली, याबद्दल सवाल उपस्थित केला जात आहे. त्यांना पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांइतकी सुरक्षा देण्यात आली? त्यांना कोणाची भीती आहे? भागवतांच्या सुरक्षेच्या समीक्षेनंतर ही वाढ करण्यात आली आहे. कथितपणे भाजप व्यतिरिक्त इतर पक्षांचे राज्य असलेल्या राज्यांमध्ये भागवतांच्या दौऱ्यादरम्यान त्यांच्या सुरक्षेत काही कमतरता आढळली होती. ज्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. भागवत हे अनेक कट्टरपंथी मुस्लीम संघटनांसह अनेक संघटनेंच्या निशाण्यावर असल्याचे सांगितले जात आहे. बांगलादेश मध्ये सुरू असलेल्या सध्याच्या प्रकारामुळे ही हा निर्णय घेण्यात आला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.