सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकऱणात राष्ट्रवादीच्या या मंत्र्याकडे बोट

0
19

नागपूर, दि. 16 (पीसीबी) : बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद नागपुरातील हिवाळी अधिवेशनातही उमटले. विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा विधिमंडळात उपस्थित करताना “राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा तालुका अध्यक्ष सहभागी आहे” असा थेट आरोप केला. तसेच राष्ट्रवादीशी संबंधित बीड जिल्ह्यातील मंत्रीही संपर्कात आहेत, असेही दानवे म्हणाले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींना अटक करण्याचं आश्वासन देत, कुठल्याही मंत्र्याकडे बोट न दाखवण्याचं आवाहन केलं.

अंबादास दानवे काय म्हणाले?
मस्साजोग येथील सरपंचाला ज्या पद्धतीने मारहाण झाली, ती पाहिली तर हृदयालाही पीळ येईल. यात सहा आरोपी आहेत, दुर्दैवाने सांगावं लागेल की राजकीय पक्षाशी संबंधित आहेत, सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा तालुका अध्यक्षही यात सहभागी आहे, तीनच आरोपी पकडले आहेत, तिघे बाकी आहेत, याकडे दानवेंनी लक्ष वेधलं.

गुन्हा घडल्यानंतर ‘बाप तो बाप रहेगा’ असं पोस्टर पोलीस स्टेशनसमोर लावलं गेलं. गुन्हेगार जर खून करुन असं म्हणत असेल, तर त्यांचे सीडीआर तपासावेत. कोणी कोणी यांना फोन केला, कोणकोणत्या राजकीय पक्षांशी ते संबंधित आहेत. एक तर राष्ट्रवादीशी संबंधित बीड जिल्ह्यातील मंत्री आहेत, असंही म्हणतात. त्यांचे जवळचे वाल्मिक अण्णा म्हणून आहेत, यांनी आरोपींना फोन केल्याचा जनतेचा आरोप आहे. आरोपींवर त्वरित कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली.

देवेंद्र फडणवीसांचं उत्तर
बीड जिल्ह्यातील मस्साजोगला घडलेली घटना अतिशय गंभीर आहे. एका तरुण सरपंचाचा निर्घृण प्रकारे खून करण्यात आला. तीन आरोपींना अटक केलेली आहे, काही अद्याप फरार असले, तरी त्यांना शोधून काढून निश्चितच अटक करु. मी विरोधीपक्ष नेत्यांना सांगू इच्छितो, की आरोपी कुठल्या पक्षाचा आहे, जातीचा किंवा धर्माचा आहे, कोणती भाषा बोलतो, कोणाशी संबंधित आहे, असा विचार न करता, जो खरोखर घटनेत सहभागी असेल, त्यावर कारवाई केली जाईल, यासाठी ही केस सीआयडीला ट्रान्सफर केली आहे. एसआयटी चौकशी करायला सांगितलं आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली