सरकार कोसळल्यानंतर महाआघाडीची पहिली बैठक २९ सप्टेंबरला

0
372

मुंबई, दि. १३ (पीसीबी) : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे प्रथमच आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक घेणार आहेत. मुंबईत येत्या २९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीला पवार यांच्यासह माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे विधीमंडळातील नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीचे महत्वाचे नेते हजेरी लावणार आहेत. त्यामुळे या बैठकीत काय घडते, याकडे राज्याचे लक्ष असणार आहे.

राज्यातील राजकीय परिस्थिती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यावर चर्चा करण्यासाठी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक घेतली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, पुढील राजकारणाची रणनीती या बैठक ठरवली जाऊ शकते. त्यासाठी महाविकास आघाडीची महत्वाची बैठक येत्या २९ सप्टेंबर रोजी होणार आहे. या बैठकीला ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे नेते उपस्थित राहणार आहेत. याशिवाय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षातील महत्वाचे नेतेही या बैठकीला हजेरी लावणार आहेत.

दरम्यान, शिवसेनेतील बंडानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. तेव्हापासून महाविकास आघाडीची बैठक शरद पवारांच्या उपस्थितीत झाली नव्हती. या अगोदर मागील अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विधानमंडळात बैठक झाली होती. मात्र, आता पवार, ठाकरे आणि काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. त्यामुळे त्याला विशेष महत्व असणार आहे.