दि.२९(पीसीबी) – राज्यातील सत्ताधारी पक्षावर टीकेची झोड उठवत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. “निवडणूक आयोगाच्या कृपेने आलेलं हे सरकार आता जनतेचं न राहता ‘बिल्डर-कंत्राटदारांचं सरकार’ बनलं आहे,” अशी टीका त्यांनी केली आहे. पुण्यातील लोकमान्य नगर पुनर्विकास प्रकल्पाला थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडून दिलेल्या स्थगितीचा उल्लेख करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
आदित्य ठाकरे यांनी एक्स वर (ट्वीटर) एक पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, “लोकमान्य नगरमधील रहिवाशांनी स्वतःच पुनर्विकासाचा निर्णय घेतला होता. तो विकास त्यांनाच हवा होता. मात्र, अचानक स्थानिक आमदाराच्या पत्रावर मुख्यमंत्री कार्यालयाने या पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती दिली. असा निर्णय झटक्यात घेण्यामागे कारण काय आहे?”
ते पुढे म्हणाले की, “क्लस्टर विकासाच्या नावाखाली हीच जागा सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या बिल्डरकडे देण्याचा प्रयत्न सुरु आहे का? जर स्थानिक नागरिकांचं मत न ऐकता मुख्यमंत्री असा निर्णय घेत असतील, तर हे सरकार नेमकं कोणाचं आहे जनतेचं की बिल्डर्सचं?”
याच पोस्टमध्ये त्यांनी पुण्यातील रस्त्यांवरील खोदकामावरूनही सरकारवर टीका केली आहे. “पुण्यातील बहुतांश रस्ते आता ऑप्टिक फायबर टाकण्यासाठी पुन्हा खोदले जाणार असल्याचं समोर आलं आहे. पण, या खोदकामासाठी मनपाकडून जो मोबदला आकारला जातो, तो सरकारचा लाडका कंत्राटदार असल्यामुळे माफ केला जाणार आहे का?” असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.











































