देहूरोड, दि. 12 (पीसीबी)
टेलिफोन डिपार्टमेंट, सीबीआय अशा सरकारी विभागातून बोलत असल्याचे सांगत एका वृद्ध व्यक्तीच्या नावाने एक पार्सल विदेशात जात असून त्यामध्ये ड्रग्स असल्याचे खोटे सांगण्यात आले. त्याआधारे वृद्ध व्यक्तीकडून २३ लाख ९१ हजार रुपये घेत त्यांची फसवणूक करण्यात आली. ही घटना ८ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर या कालावधीत देहूरोड येथे घडली.
याप्रकरणी ६६ वर्षीय व्यक्तीने शनिवारी (दि. ११) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना फोन करून फोनवरील व्यक्ती टेलिफोन डिपार्टमेंट मधून बोलत असल्याचे सांगितले. फिर्यादी यांच्या नावाने एक पार्सल थायलंड येथे जात असून त्यामध्ये पाच पासपोर्ट, तीन सिमकार्ड व १५० ग्रॅम ड्रग्स आहे. हे पार्सल दिल्ली एअरपोर्ट येथे जप्त केले आहे. त्याबाबत तुमच्या नावावर सायबर क्राईम दिल्ली येथे तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून बोलणाऱ्या व्यक्तीने फिर्यादी यांच्यावर मानवी तस्करी आणि मनी लॉन्डरिंगचे गुन्हे दाखल झाल्याचे सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांच्याकडून पैसे घेत त्यांची २३ लाख ९१ हजार ३७९ रुपयांची फसवणूक करण्यात आली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.