सरकारी पैशातून खरेदी केलेल्या २२ लॅन्ड क्रूझर गाड्यांची खरेदी कोणी लपवली

0
242

हैद्राबाद, दि. २८ (पीसीबी) : तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा एक धक्कादायक प्रताप समोर आला आहे. विधानसभा निवडणुकीत आपल्याचा पक्षाला बहुमत मिळणार, या आशेवर त्यांनी सरकारी पैशातून एक-दोन नव्हे तर तब्बल 22 लँड क्रूझर गाड्या खरेदी केल्या होत्या. एवढेच नाही तर या गाड्या खरेदी केल्याची माहिती कुणालाच नव्हती. नव्याकोऱ्या गाड्या लपवून ठेवण्यात आल्या होत्या.

केसीआर यांच्या या खरेदीची माहिती खुद्द तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनीच दिली आहे. बुधवारी मीडियाशी बोलताना रेड्डी यांनी ही पोलखोल केली. विधानसभा निवडणुकीआधी केसीआर यांनी 22 लँड क्रूझर गाड्या खरेदी केल्या होत्या. मुख्यमंत्री झाल्यानंतर पुढचे दहा दिवस या गाड्यांबाबत आपल्यालाही माहिती नसल्याचे रेड्डी यांनी सांगितले.

केसीआर यांनी खरेदी केलेल्या गाड्या लपवून ठेवल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला आहे. 22 गाड्या घेऊन त्या विजयवाडा येथे लपवून ठेवल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. शपथविधी झाल्यानंतर या गाड्या बाहेर काढायच्या, असा विचार होता. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर केसीआर घरी गेले. त्यांनी गाड्यांबाबत कुणालाच सांगितले नव्हते. ही सरकारी मालमत्ता आहे, अशी माहिती मुख्यमंत्री रेड्डी यांनी दिली.

दरम्यान, केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीने सरकारच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी ‘शॅडो टीम’ तयार करण्याचा निर्णय घेतला आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना शॅडो टीम कशासाठी?, असा सवाल रेड्डी यांनी केला. विरोधी पक्ष विधानसभेत सरकारच्या निर्णयांवर चर्चा करू शकते. ते अनेक गोष्टी सुचवू शकतात. मग शॅडो टीम कशासाठी, असे रेड्डी यांनी सांगितले.

कालपर्यंत तुम्ही मंत्री होता. मंत्री असताना तुम्ही काम केले नाही. आता किमान शॅडो मंत्री म्हणून काम करावे. पराभव झाल्यानंतर अनेक जण भीतीतून असे बोलत असतात, त्यामुळे आम्ही त्याला चुकीचे समजत नाही, असे टोलाही रेड्डी यांनी लगावला.