सरकारी नोकरी लावतो म्हणून तरुणांना गंडा घालणाऱ्या ओमकारचा पर्दाफाश

0
210

लोणावळा, दि. १२ (पीसीबी) – सरकारी नोकरी लावण्याच्या आमिषाने मावळ तालुक्यातील तरुणांच्याकडुन लाखात पैसे उकळणाऱ्या सैन्य दलातील एका कर्मचाऱ्याचा बाजार पुणे (जिल्हा) ग्रामिण पोलिसांनी उठवला असुन, लोणावळा येथील आयएनएस शिवाजी मधील एक कर्मचारी ओमकार सुनिल भावे (सध्या जीई सीएमई दापोडी, सरकारी निवास, मुळगाव -कुसगाव ता. मावळ जि. पुणे) याला लोणावळा पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ताब्यात घेतले आहे. दरम्यान ओमकार सुनिल भावे याच्याबाबत केंद्रिय सुरक्षा विभागानेही ग्रामिण पोलिसांना महत्वाची माहिती पुरवली आहे.

जिल्हा (ग्रामिण) पोलिसांनी ओमकार भावे याच्या घरातुन सरकारी शिक्के , लेटरहेड ताब्यात घेतले असुन, ओमकार भावे व त्याची एक मैत्रीण रचना सुर्वे या दोघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर ओमकार भावेच्या विरोधात वर्षा शांतेश्वर कदम (वय- २९ वर्ष शिक्षण १२ वी व्यवसाय- कँटीन व्यवसाय रा. जिल्हा परीषद शाळे शेजारी, विश्वनाथ ससाणे यांचे भाड्याचे रुम मध्ये कुरवंडे ता. मावळ जि. पुणे मुळ रा. लोहारा ता. लोहारा जि. उस्मानाबाद) या महिलेने नोकरी लावण्याच्या आमिषाने आठ लाख रुपयांची फसवणुक केल्याची तक्रार लोणावळा शहर पोलिसात दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षा कदम या लोणावळा येथील आयएनएस शिवाजी या संस्थेचे कॅन्टीन चालवतात. तर ओमकार भावे हा आयएनएस शिवाजी या केंद्रिय संस्थेच्या आरोग्य विभागात क्लर्क या हुद्द्यावर काम करत होता. कॅन्टीनमध्ये चहा पिण्यासाठी ये-जा असल्याने, कदम व भावे यांची ओळख झाली. या ओळखीतुनच भावे याने रेल्वेत नोकरी लावण्याच्या उद्देशाने अठरा लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र वर्षा कदम यांच्याकडुन एवढी रक्कम अॅडजस्ट होणार नसल्याचे लक्षात आल्याने भावे याने आठ लाख रुपयात नोकरी लावण्याचे आश्वासन देत वेळोवेळी पैसे उकळले होते.

दरम्यान, पैसे देऊनही काम होत नसल्याने, वर्षा कदम यांनी ओमकार भावे याच्या मागे कामाचा तगादा लावला होता. या तगाद्याला कंटाळुण ओमकार भावे याने वर्षा कदम यांना नोकरीवर हजर होण्याबाबतचे बनावट नियुक्ती पत्र, सरकारी ड्रेस व कपडेही आणून दिले होते. मात्र वर्षा कदम यांना संशय आल्याने त्यांनी शहर पोलिसात धाव घेतली व ओमकार भावे यांच्याबाबतची माहिती पोलिसांना दिली. तर दुसरीकडे ओमकार भावे हा सरकारी शिक्के व लेटरहेडचा वापर करुन लोकांची फसवणुक करत असल्याचा संशय केंद्रिय सुरक्षा विभागाला आल्याने, त्यांनीही ग्रामिण पोलिसांना अलर्ट केले होते.