सरकारने मान्य केली चूक

0
4

– घटनास्थळी सुरक्षारक्षक का नव्हते? – राहुल गांधी

दि . २५ ( पीसीबी ) – जम्मू-कश्मीरमधील पहलगाम भागात मंगळवारी मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांसह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. या बैठकीत सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना हल्ल्यासंदर्भात माहिती देण्यात आली. यावेळी गृहमंत्री अमित शाह यांनी सुरक्षा यंत्रणेत चूक झाल्याचे मान्य केले.

पहलगाम हल्ल्यानंतर बहुतांश राजकीय पक्षांनी गुप्तचर यंत्रणेचे अपयश आणि त्या भागातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही घटनास्थळी सुरक्षारक्षक का नव्हते? असा प्रश्न विचारला. त्यावर सरकारने सविस्तर उत्तर दिले.

सर्वपक्षीय बैठकीनंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी माध्यमांशी संवाद साधला. “भारताने एकत्र येऊन दहशतवादाविरुद्ध लढा लढला पाहिजे, यावर या बैठकीत सर्वांचे एकमत झाले. भारताने यापूर्वीही दहशतवादाविरुद्ध कठोर पावलं उचलली आहेत आणि यापुढेही भारत ते करत राहील. या बैठकीत सर्व राजकीय पक्षांनी दहशतवादाविरुद्धच्या लढाईत सरकारसोबत असल्याचे स्पष्ट केले. सर्वपक्षीय नेत्यांनी सरकार जी काही पावलं उचलेल, त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल, असे आश्वासन दिले” असे किरेन रिजिजू यांनी म्हटले.

गुप्तचर विभाग (आयबी) आणि गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी घटना कशी घडली आणि नेमकी कुठे चूक झाली, याबद्दल बैठकीत चर्चा झाली. या चर्चेबद्दलची सविस्तर माहिती केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. “सामान्यतः हा मार्ग जून महिन्यात अमरनाथ यात्रा सुरू झाल्यावर उघडला जातो. कारण अमरनाथ यात्रेचे भाविक या ठिकाणी विश्रांती घेतात. पण यंदा काही स्थानिक टूर ऑपरेटर्सनी सरकारला कोणतीही माहिती न देता पर्यटकांच्या बुकिंग्स घेणे सुरू केले. तसेच २० एप्रिलपासून पर्यटकांना तेथे नेण्यास सुरुवात केली. याची माहिती स्थानिक प्रशासनाला नव्हती. त्यामुळे त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली नव्हती”, असे सरकारने म्हटले.