जालना, दि. १८ (पीसीबी) : अंतरवाली सराटी इथे मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु आहे. जरांगेंच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. मात्र मनोज जरांगेंच्या उपोषणानंतर ओबीसी समाज सुद्धा आता रस्त्यावर उतरला आहे. आज सकाळी अचानक ओबीसी कार्यकर्ते मंगेश ससाने यांनी अंतरवाली सराटी येथील वडीगोद्री ते अंतरवाली रोडवर उपोषणाला सुरुवात केलेली आहे. अचानक उपोषणाला बसल्यामुळे स्थानिक प्रशासनाची धांदल उडाल्याचे चित्र दिसत आहे. ओबीसी समाजाचे आंदोलन सुरु होताच, याच ठिकाणी पोलीस बंदोबस्त मोठ्या संख्येने लावण्यात आला आहे.
अंतरवाली सराटीला जाणारा येणारा रस्ता देखील पोलिसांनी बंद केला आहे. संध्याकाळी सहा वाजता उपोषणकर्ते लक्ष्मण हाके देखील वडीगोद्री फाट्यावर उपोषण करणार आहेत . मात्र हाके वेगळ्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहेत. मंगेश ससाणे यांचे वेगळ्या ठिकाणी उपोषण सुरु आहे. वडीगोद्रीमध्ये दोन ओबीसी आंदोलन सुरू झाल्यामुळे मात्र आता चर्चाला उधाण आले आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणस्थळापासून एकाच ठिकाणी दोन ओबीसी आंदोलन सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.
परंतु आता यासोबत नवनाथ वाघमारे देखील आंदोलन करणाच्या तयारीत आहेत. आता वाघमारे कुठे आंदोलनाला बसणार? वेगळे बसणार की हाके यांचा सोबत बसणार? की मंगेश ससाणे यांचा सोबत बसणार? असा प्रश्न स्थानिक प्रशासनाला उद्भवला आहे.