सरकारचा रिमोट कंट्रोल देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ?… एकनाथ शिंदे म्हणतात…

0
290

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – राज्यात सत्तांतर झालं असून एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आपण कोणतंही पद स्वीकारणार नाही असं जाहीर केल्यानंतर केंद्राने आग्रह केल्याने त्यांनी उपमुख्यंत्रिपद स्वीकारलं. त्यानंतर आता या सरकारचा रिमोट कंट्रोल देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच असल्याचं विरोधकांकडून बोललं जात आहे. दरम्यान यावर एकनाथ शिंदे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना उत्तर दिलं आहे.

सरकारचा रिमोट तुमच्या हातात असणार की फडणवीसांच्या असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की, “आम्ही दोघे चांगले मित्र असून एकमेकाला विश्वासात घेऊन काम करु. आमच्या दोघांचा पर्सनल अजेंडा काही नसून राज्याचा सर्वांगीण विकास हाच अजेंडा आहे”.सूरतला जाण्याआधी उद्धव ठाकरेंसोबत बोलणं झालं होतं का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “मी त्यांच्याशी बोललो आणि चाललो आहे असं सांगितलं. त्यांनी परत या म्हटलं. पण मी त्यांना परत येईन की नाही माहित नाही सांगितलं. कारण मी जेव्हा प्रयत्न केले तेव्हाच विचार केला असता, निर्णय बदलला असता तर ही वेळ आली नसती”. आम्ही पाच वेळा त्यांच्याकडे भूमिका मांडली. पण त्यात यश आलं नाही असंही त्यांनी सांगितलं.

“हा निर्णय मी फक्त माझ्या खच्चीकरणामुळे घेतलेला नाही. जे २५-३० आमदार होते त्यांना रोज येणारा अनुभव, त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न यामुळे पुन्हा निवडून येण्याची चिंता सतावत होती. कारण पडलेल्या उमेदवाराला घटक पक्ष ताकद देऊ लागले आणि आमच्या लोकांचं खच्चीकरण करु लागले. आमच्या शिवसैनिकांवर खोट्या केसेस टाकून त्यांना तडीपार करण्यात आलं. निर्दोष असतानाही मोक्कासाऱख्या कारवाईंना सामोरं जावं लागलं,” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.
“शिवसेनेला, शिवसैनिकांना काय मिळालं? शिवसैनिकाला या सत्तेचा काय फायदा झाला? त्यांची फरफट सुरुच होती. आम्ही आमच्या प्रमुखांना यात बदल झाला पाहिजे असं सांगितलं होतं. शेवटी जी आघाडी केली आहे ही फायदेशीर नाही. मुख्यमंत्री आमचा असताना नगरपालिका, नगरपंचायतींमध्ये शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकली गेली. असंच सुरु राहिलं तर या ३०-४० आमदारांचं भवितव्य १०० टक्के धोक्यात आलं असतं. यामुळेच आमदारांना मला निर्णय घ्या अन्यथा आम्ही वेडावेकडा निर्णय घेऊ सांगितलं,” अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

“हा एका दिवसात झालेला प्रकार नाही. आमदारांचा त्रास रोज वाढत होता. आम्ही हे सांगण्याचा प्रयत्नही केला. पुन्हा भाजपासोबत युती करु शकतो का यासंबंधी विचारणाही केली. पण त्यात आम्हाला यश आलं नाही,” असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. नाईलाज म्हणून हा निर्णय घेतला, पण आम्ही भाजपाशी युती करुन चुकीचा निर्णय घेतला नसल्याचंही ते म्हणाले आहेत.
“आम्हाला लोकांचं समर्थन मिळत आहे. ठाण्यात पाऊस कोसळत असतानाही हजारोंच्या संख्येने लोक वाट पाहत उभे होते. चुकीचं पाऊल उचललं असतं तर हे शिवसैनिक आमच्यासोबत उभे राहिले नसते,” असं एकनाथ शिदेंनी सांगितलं.
उद्धव ठाकरेंनी पुन्हा सोबत येण्याची हाक दिल्यास जाणार का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “ज्या प्रकारे आमच्यावर आरोप करत आहेत, पक्षातून काढलं आणि दुसरीकडे चर्चेसाठी माणसं पाठवली. आमचे पुतळे जाळण्यात आले, बदनामी करत आहेत, खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहे ते पाहता त्यांना अशी अपेक्षा असेल असं वाटत नाही”.