सरकारचं धाकधूक व्हायला लागलंय

0
48

गंगाखेड, दि. १७ : महाराष्ट्रातल्या जनतेने या सरकारला नापास केलं आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी दिल्लीतल्या पिताश्रींना सांगून महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक पुढे ढकलली आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे. गेल्या पंधरा वर्षांत पहिल्यांदाच महाराष्ट्र आणि हरियाणा यांची निवडणूक एकत्र होणार नाही हे घडतंय असंही अमोल कोल्हेंनी म्हटलं आहे. अमोल कोल्हे यांनी गंगाखेड या ठिकाणी जे भाषण केलं त्या भाषणात त्यांनी सरकारविरोधात टोलेबाजी केली आहे.

गंगाखेडमध्ये शिवस्वराज्या यात्रा पोहचली आहे. या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या सभेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं उदाहरण देत अमोल कोल्हेंनी सरकारविरोधात टोलेबाजी केली. तसंच निवडणूक जिंकण्याची धास्ती असल्यानेच ती पुढे ढकलण्यात आल्याचा आरोप केला आहे.

“जम्मू-काश्मीरच्या सुरक्षा आवश्यकतांमुळे महाराष्ट्रातील निवडणुका नंतर जाहीर केल्या जातील”, असं राजीव कुमार यांनी म्हटलंय. “महाराष्ट्रात पाऊस आहे. अनेक सण उत्सव आहे. गणेशोत्सव, पितृपक्ष, नवरात्री, दिवाळी हे सण आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यांत इथंही निवडणुका होतील”, असंही ते म्हणाले. राज्यातील महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्या निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागल्या असून आधी जागावाटप व नंतर उमेदवार निश्चिती अशी प्रक्रियाही सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे लोकसभा निवडणुकांच्या निकालांची अद्याप चर्चा होत असताना विधानसभा निवडणुका मात्र लांबणीवर पडल्या आहेत. यानंतर आता अमोल कोल्हेंनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

अमोल कोल्हे यांनी काय म्हटलं आहे?
एकदा एका कॉलेज मालकाचं पोरगं होतं. त्याचा परीक्षेचा नीट अभ्यासच झाला नव्हता. त्या पोराला दररोज वाटायचं की मी परीक्षेत नापास होईल. त्याने बरेच प्रयत्न केले, गाईड आणलं, कॉपी करायची सवय केली, तरीही पोराला खात्री पटलीच नाही की आपण पास होऊ. मग तो त्याने बापाला जाऊन सांगितलं परीक्षा थोडी पुढे ढकला. बापाने विचारलं कशाला पुढे ढकलायची परीक्षा? नियमानुसार परीक्षा झाली पाहिजे. त्यावर तो पोरगा म्हणाला माझा अभ्यासच झाला नाही. तुम्हाला कळलं असेल ना पोरगं कोण ते? असा टोला अमोल कोल्हेंनी लगावला.

“जी ऑक्टोबरमध्ये व्हायची, ती नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता निर्माण झाली, कारण पोराला कळलं महाराष्ट्राची जनता नापास होणार आहे… म्हणून महायुती सरकारनं त्यांच्या दिल्लीतील पिताश्रींना सांगितलं, तेवढं निवडणूक आयोगाला सांगा, कुठलातरी क्लॉज वापरा. 15 वर्ष हरियाणा आणि महाराष्ट्राची निवडणूक बरोबर व्हायची, यंदा पहिल्यांदाच महाराष्ट्राची निवडणूक हरियाणाबरोबर होत नाही. माननिय निवडणूक आयोगानं पाऊस पितृपक्ष, गणेशोत्सव, दिवाळी कितीही कारणं दिली असली, तरी महाराष्ट्रातील जनतेला ठाऊक आहे, सरकारचं धाकधूक धाकधूक आणि पाकपूक व्हायला लागलंय आणि म्हणूनच निवडणूक पुढे ढकलली.” असा दावा अमोल कोल्हेंनी केला.