‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपट आपटला, तर कमल हसनचा `विक्रम`ची घोडदौड सुरूच

0
598

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. चित्रपटाबाबत बरीच चर्चा सुरु होती, मात्र बॉक्स ऑफिसवर निराशा झाली. आता यावर अभिनेता सोनू सूदने प्रतिक्रिया दिली आहे. या चित्रपटात सोनू सूदने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटात सोनू सूद हा चांद बरदाईच्या भूमिकेत आहे. त्याच्या कामाचं कौतुक चाहत्यांकडून होत आहे. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सोनू सूदला चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही याबाबत विचारण्यात आलं. त्यावर उत्तर देताना सोनू सूद म्हणाला की, “हा चित्रपट खास असा आहे. मला यात भूमिका साकारण्याची संधी मिळाली. लोकांनीही खूप प्रेम दिलं. मी माझ्या प्रेक्षकांचे या प्रेमासाठी आभार मानतो.”

‘सम्राट पृथ्वीराज’ने बॉक्स ऑफिसवर १०.७० कोटी रुपयांसह पहिल्या दिवशी खातं उघडलं होतं. त्यानंतर शनिवारी १२.६० कोटी तर रविवारी १६.१० कोटी रुपये कलेक्शन झालं होतं. पहिल्या आठवड्यात चित्रपटाने ३९.४० कोटींची कमाई केली. आता पुढच्या काही दिवसात किती कमाई करते हे बघावं लागेल. अक्षय कुमारच्या ‘सम्राट पृथ्वीराज’च्या तुलनेत कार्तिक आर्यनची ‘भूल भुलैय्या २’ची कमाई चांगली होत असल्याचं दिसत आहे.

दुसरीकडे कमल हासन यांच्या ‘विक्रम’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुच आहे. या चित्रपटाने विकेण्डलाच बॉक्स ऑफिसवर १७५ कोटी रुपयांचा गल्ला जमावला. इतकंच नव्हे तर काही देशांमध्ये टॉप १० चित्रपटांच्या यादीमध्ये ‘विक्रम’ चित्रपटाचा समावेश झाला आहे. ‘विक्रम’ला प्रेक्षकांची अधिकाधिक पसंती मिळताना दिसत आहे.

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचा हा पहिलाच चित्रपट होता. अक्षय-मानुषीने या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अधिकाधिक मेहनत घेतली होती. इतकंच नव्हे तर या चित्रपटाच्या कलाकारांनी अधिक मानधन देखील घेतलं होतं. ‘सम्राट पृथ्वीराज’कडून प्रेक्षकांना बऱ्याच अपेक्षा होत्या. मात्र अक्षयच्या या चित्रपटाने प्रेक्षकांना नाराज केलं.